no images were found
राजर्षी शाहू जयंती उत्सवानिमित्त शाहू स्मारक भवनात व्याख्यानमालेची सुरुवात
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सवानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने शाहू स्मारक भवनात 21 ते 25 जून 2024 दरम्यान सायंकाळी 6 वाजता राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी दिली आहे.
राजर्षी शाहू व्याख्यानमालेची सुरुवात शाहू स्मारक भवन येथे शुक्रवार दि. 21 जून 2024 पासून होत आहे. या अंतर्गत 21 जून रोजी सायंकाळी 6 वाजता भारतातील संसदीय लोकशाही या विषयावर दै. लोकमतचे संपादक वसंत भोसले यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी राज्यशास्त्राच्या अभ्यासक डॉ. भारती पाटील उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दि. 22 रोजी भारतातील न्यायव्यवस्था या विषयावर साताऱ्याचे ज्येष्ठ राजकीय अभ्यासक डॉ. शिवाजी पाटील यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राजकीय विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार असणार आहेत.
रविवार दि. 23 रोजी भारतीय राष्ट्रवाद-वाटा आणि वळणे या विषयावर साताऱ्याचे ज्येष्ठ राजकीय विचारवंत किशोर बेडकीहाळ यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर असणार आहेत.
सोमवार दि. 24 जून रोजी भारताचे परराष्ट्र धोरण या विषयावर राज्यशास्त्राच्या अभ्यासक (मुंबई) डॉ. उत्तरा सहस्त्रबुध्दे यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार असणार आहेत.
मंगळवार दि 25 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारताचे संविधान या विषयावर माजी सनदी अधिकारी तथा साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार असणार आहेत.
राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान सोहळ्याचे 26 जुनला आयोजन
सन 2024 चा राजर्षी शाहू पुरस्कार हा राजर्षी शाहू यांचे कार्य व विचार बृंध्दिगत करणाऱ्या पन्नालाला सुराणा यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष अमोल येडगे तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान सोहळ्यास व व्याख्यानमालेस सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी केले आहे.
**