
no images were found
बुरखा घालण्यास नकार; मुंबईत पतीकडून पत्नीचा खून
मुंबई : तीन वर्षांपूर्वी आंतरधर्मीय विवाह केलेल्या इक्बाल महमूद शेख नावाच्या तरूणाने त्याची पत्नी रुपालीची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुरखा आणि हिजाब प्रकरणावरून देशात एकीकडे गदारोळ माजलेला असतानाच मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.मुस्लिम प्रथा न पाळल्यामुळे आणि बुरखा घालण्यास नकार दिल्याने ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इक्बालच्या सततच्या त्रासाला रुपाली कंटाळली होती. त्यामुळे तिने घटस्फोट मागितला होता. मात्र, त्यापूर्वीच इक्बालने रुपालीची हत्या केली. मुंबईतील चेंबूर परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली असून, पोलिसांनी आरोपी इक्बालला अटक केली आहे.
रुपालीचा विवाह इक्बाल शेख या तरुणाशी तीन वर्षांपूर्वी झाला होता. दोघेही चेंबूर परिसरात असलेल्या इक्बालच्या घरी राहत होते. रुपाली हिंदू असल्याने आणि लग्नानंतरही ती मुस्लिम रितीरिवाज पाळत नसल्याने स्वत: इक्बाल आणि त्याचे कुटुंबीय त्याच्यावर नाराज होते. तसेच इक्बालचे कुटुंब रुपालीवर सातत्याने बुरखा घालण्यासाठी दबाव आणत होते. मात्र, त्यानंतरही रुपाली बुरखा परिधान करण्यास नकार देत होती. याच कारणावरून रुपाली आणि इक्बाल यांच्यात वाद होत होते. त्यामुळे दोघेही वेगळे राहत होते.
या जोडप्याला दोन वर्षांचा मुलगाही आहे.इकबाल शेख याने रुपालीला सोमवारी सायंकाळी चेंबूर परिसरातील पीएल लोखंडे मार्गावरील नागेवाडी येथे भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी बुरखा आणि इतर गोष्टींवरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर रुपालीने इक्बालकडे घटस्फोटाच्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि इक्बालने त्याच्याकडील चाकूच्या सहाय्याने रुपालीवर वार केले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. रुपाली आणि इक्बाल यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. रुपाली ही इक्बालची दुसरी पत्नी होती. इक्बालने आपल्या पहिल्या पत्नीला मुले होत नसल्यामुळे घटस्फोट दिला होता.