no images were found
टाकळीवाडीत ३ सावकारांवर छापे; जमिनी कमी किमतीत लुबाडल्याच्या तक्रारी
कोल्हापूर : टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथे व्याजाने पैसे देऊन त्या मोबदल्यात कोट्यवधीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर येतेय. सावकारीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनी कमी रक्कमेत बळकावण्याचा प्रयत्न करणार्या टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील १) धनपाल निंगाप्पा भमाणे, २) सदाशिव धनपाल भमाणे या दोन सावकारांच्या घरावर सहकार विभागाच्या अधिकार्यांनी धाड टाकली. या दोन सावकारांच्या घरात जमिनी खरेदी केलेले ५० ते १०० रुपयांचे सहा स्टॅम्पपेपर, ९ जमीन खरेदीपत्रे व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ तालुका सहायक निबंधक कार्यालयाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
टाकळीवाडी येथील भमाणे मेंढपाळ बंधू यांच्याबद्दल ते सावकारी करत असून, कमी पैशांच्या मोबदल्यात शेतकर्यांकडून जमिनीची लुबाडणूक करत आहेत, अशा तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आलेल्या होत्या. त्या तक्रारीनुसार शिरोळ तालुका सहायक निबंधक कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेसाठी सहकार अधिकारी श्रेणी-१ चे आर. जी. कुलकर्णी, शैलेश शिंदे, संतोष कांबळे, जे. एन. बंडगर, व्ही. व्ही. वाघमारे, पी. व्ही. फडणीस, अजित गोसावी, पांडुरंग खोत यांचा सहभाग असलेली २ पथके तयार ठेवण्यात आली होती.
भमाणे यांच्या घराची झडती एका पथकाकडून घेण्यात आली तर त्यामध्ये २१ लाखांचे दस्त मिळाले आहेत. या रकमेत साडेपाच हेक्टर जमीन या सावकारांनी बळजबरीने खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. दोन्ही सावकारांचा जबाबदेखील आता नोंदविण्यात येईल.
दरम्यान टाकळीवाडीतील सहकार खात्याचे पथक अजून एक सावकार अजित आम्माण्णा गोरवाडे यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेले होते; परंतु त्यांचे घर बंद असून सर्व कुटुंब दक्षिण भारत सहलीवर गेले असल्याची चौकशीदरम्यान माहिती मिळाली. या पथकाकडून गोरवाडे यांचे घरदेखील सील करण्यात आलेले आहे.
एक हेक्टर जमीन अवघ्या ९ लाखांत खरेदी केली आहे. आत्ताच्या भावाप्रमाणे शिरोळ भागातील या जमिनीची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत जाते. तसेच आणखी एका गरीब व गरजू व्यक्तीकडून १ हेक्टर २ गुंठे जमीन ७ लाख १५ हजारांना खरेदी केली आहे. आणखी एकाची एक हेक्टर १८ गुंठे जमीन ४ लाख ५० हजारांना खरेदी केली आहे. तर एकाची १ गुंठा जमीन १ लाख ३० हजारांत खरेदी केली आहे. सापडलेल्या कागदपत्रांवरून या दोन्ही सावकारांकडून गोरगरिबांच्या लुबाडणूकीचा प्रकार घडत असल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे.