no images were found
एम | ओ | सी कोल्हापूर तर्फे कॅन्सरला शह दिलेल्या विजेत्यांचा सत्कार सोहळा दिमाखात पार पडला
कोल्हापूर-कॅन्सर झाला म्हणजे यमसदनातून निमंत्रणच आलय जणू अशी एकंदर धारणा आपल्या समाजात आजही घर करून आहे. आपल्याला कॅन्सर आहे ही वस्तुस्थिती स्वीकारणे ही सोपी गोष्ट नक्कीच नाही परंतु काही दुर्मिळ, हट्टी, निश्चय रुग्ण हे आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या आणि योग्य वैद्यकीय सल्ल्याच्या मदतीने कॅन्सर सारख्या आजारावर मात करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतात.
अशाच काही कॅन्सरला शह दिलेल्या विजेत्यांचा सत्कार सोहळा काल दिनांक 8 जून 2024 रोजी एम | ओ | सी कोल्हापूर या संस्थेमार्फत दिमाखात पार पडला. सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून “पावनखिंड फेम” आणि मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले अभिनेते श्री. अजय पुरकर यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. त्यांनी उपस्थित सर्व विजेत्यांशी संवाद साधून त्यांचे भरभरून कौतुक करत त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम याप्रसंगी केले. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॅा. माणिकराव सांळुखे सरांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले.
आपले मनोगत व्यक्त करताना, या कार्यक्रमाचे यजमान आणि एम | ओ | सी कोल्हापूरचे अनुभवी कर्करोगतज्ञ डॉ.अक्षय शिवछंद म्हणाले; “कोणत्याही डॉक्टरचं समाधान हे त्याच्या रुग्णाच्या सर्व यातना दूर करून त्याला आजारातून पूर्ण बरं करणे यातच असतं. तो हेतू साध्य करताना डॉक्टर आपले शर्तीचे प्रयत्न करतच असतात. परंतु कॅन्सर सारख्या आजाराशी आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असताना, रुग्णांची मानसिक तयारी, मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळा दूर करण्याचा निर्धार, दिलेले उपचार वेळीच पूर्ण करण्याचा निश्चय आणि या प्रवासात कुटुंबीयांचा बिनशर्त पाठिंबा अशा बऱ्याच गोष्टी आवश्यक असतात. इथे जमलेल्या सर्व विजेत्यांनी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या सर्व गोष्टी साध्य करत कॅन्सरला शह दिला हे ऐतिहासिक आहे असंच म्हणावं लागेल.”
विजेता या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सर्व रुग्णांचा सत्कार आणि कौतुक करून त्यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची संधी देऊन समाजातील इतर रुग्णांना “कॅन्सरलाही हरवता येत” असा सकारात्मक संदेश देणं हाच आमचा निरागस प्रयत्न आहे असेही डॉ. अक्षय शिवछंद म्हणाले.एम | ओ | सी कोल्हापूर ही कॅन्सरच्या रुग्णांना अध्यायावत , सहानुभूतीपूर्वक आणि वाजवी दरात उपचार उपलब्ध करून देणारी कोल्हापूर शहर आणि पंचक्रोशीतील एकमेव कॅन्सर डे-केअर संस्था आहे. डॉ. अक्षय शिवछंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कोल्हापुरात गेली दोन वर्ष रुग्णसेवेचे कार्य अविरतपणे करीत आहे. गेल्या दोन वर्षात एम | ओ | सी कोल्हापूरने ३००० हून अधिक रुग्णांचे यशस्वीरित्या उपचार केले आहेत. त्यापैकी बरेचसे कॅन्सर रुग्ण उपचाराअंती पूर्णतः बरे होऊन सुखी आणि निरोगी आयुष्य व्यतीत करीत आहेत.