no images were found
येत्या काही दिवसांत पावसाचा परतीचा प्रवास
मुंबईः महाराष्ट्रात आता आठवडाभर पावसाचा जोर कमीच राहणार आहे. देशातून नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याची दाट शक्यता आहे. याच काळात मोठ्या पावसासाठी आवश्यक कमी दाबाची क्षेत्रे तयार होण्याची शक्यताही कमी असल्याचे हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू आहे. मात्र, उत्तरेकडील राज्यात बहुतांश भागात पाऊस कोसळत आहेत. राज्यातही पुढील आठवडाभर अनेक भागांत पावसाचा जोर ओसरणार काही. काही भागांत पाऊस आठवडाभर विश्रांती घेण्याची दाट शक्यता आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. येत्या २-३ दिवसांतही अशीच परिस्थिती राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
महाराट्रातून ऑक्टोबरमध्ये सुरुवातीच्या दहा-बारा दिवसांत परतीचा पाऊस सुरू होणार आहे. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंतच्या सरासरीच्या २६ टक्के पाऊस अतिरिक्त नोंदला गेला आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी १७ जिल्ह्यात सरासरीइतका, १७ जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त आणि दोन जिल्ह्यांमध्ये तीव्र अतिरिक्त पाऊस पडला आहे. गोव्यामध्ये मात्र सरासरीची श्रेणी असली तरी सात टक्के पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे. केरळमध्येही आत्तापर्यंतच्या सरासरीच्या ११ टक्के पाऊस कमी नोंदला गेला आहे.