
no images were found
नवरात्र उत्सव निमित्ताने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान
कोल्हापूर : नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये १८ वर्षांवरील सर्व महिला, माता व गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या अभियानाअंतर्गत शुक्रवारी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूका कार्यालय येथे नियोजन सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस उप-आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त संदीप घार्गे, आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव, प्रकल्प अधिकारी आयसीडीएस, प्रतिनिधी स्कूल बोर्ड, प्रशासकीय वैद्यकिय अधिकारी, वैद्यकिय अधिकारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, तसेच बालरोग तज्ञ संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गर्भधारणापूर्व आरोग्य सेवा, स्त्रीरोग निदान व उपचार, सम पदेशन, मधुमेह / रक्तदाब / कर्करोग पडताळणी व उपचार, क्षयरोग तसेच इतर संसर्गजन्य आजार तपासणी व उपचार या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १८ वर्ष वरील जास्तीत जास्त महिलांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिल्या. याचबरोबर शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास योजना इत्यादी विभागांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले. या अभियान काळात जास्तीत जास्त महिलांनी तपासणी करून घेऊन या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहनही प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. याशिवाय सदर मोहिम कालावधीमध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग तसेच महिलांकरीता डोळयांचे आजार तपासणी शिबीर आयोजित करण्याच्या सूचना आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव यांना दिल्या.
याच बैठकीमध्ये महापालिकेअंतर्गत नियमित लसीरण, कृतीदल समिती बैठक प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी घेतली. यामध्ये लसीकरण अधिकारी डॉ.रुपाली यादव यांनी महापालिकेअंतर्गत नियमित लसीकरण कामकाजाबाबतची स्लाईड शोद्वारे सविस्तर सादरीकरण केले. शहरामध्ये एकही गरोदर माता तसेच 5 वर्षाखालील बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातील सर्व उपस्थित वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिल्या.