no images were found
नगररचना कार्यालयातील कामासाठी नागरिकांनी अपप्रवृत्तींना बळी न पडता या विभागातील अधिका-यांशी संपर्क साधावा – विनय झगडे
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासुन नागरिकांमध्ये नगररचना विभागाची प्रतिमा जाणिवपुर्वक मलीन करण्याचे काम काही अपप्रवृत्ती करत असुन त्यातूनच काही दैनिकात चुकीच्या बातम्या प्रसिध्द होत आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागामार्फत शहरातील नागरिक, विकासक यांनी रितसर पध्दतीने अर्ज सादर केल्यानंतर विविध प्रकारच्या विकास परवानग्या (बांधकाम परवाना,रेखांकन मंजुरी, भोगवटा) देण्यात येतात. शासन निर्णयाप्रमाणे सर्व प्रकारच्या विकास परवानग्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावली 2020 नुसार बिल्डींग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीमव्दारे दि.1 जानेवारी 2024 पासुन देण्यात येतात. यापुर्वी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने विकास परवानग्या देण्यात येत होत्या. महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापैकी नगररचना विभाग हा महत्वाचा विभाग असुन उपलब्ध तांत्रिक मनुष्यबळाच्या आधारे योग्य प्रकारे नियोजन करून इकडील विभागामार्फत नागरीकांची कामे केली जातात. या विभागाने सन 2021-22 साली 77.32 कोटी, सन 2022-23 साली 70.51 कोटी व सन 2023-24 साली 91.82 कोटी एवढा महसुल गोळा केलेला आहे.
सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सार्वत्रिक लोकसभा निवडणुक जाहिर झाल्याने इकडील कार्यालयाकडील सहा.संचालक नगररचना, उपशहर रचनाकार व कनिष्ठ अभियंता यांची आचारसंहिता प्रमुख, क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष व इतर निवडणूकसंबंधी कामकाजासाठी आदेश काढण्यात आलेले होते. परंतु सदरचे कामकाज सांभाळुन इकडील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी कार्यालयीन कामकाज पुर्ण केलेले आहे. परंतु काही अपप्रवृत्तीं धारकांनी परिपुर्ण माहिती न घेता वृत्तपत्रामध्ये परवानगीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्याच्या निरर्थक बातम्या देऊन त्या प्रसिध्द केल्याने कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची नाहक बदनामी होत आहे. तरी नागरिकांनी अशा अपप्रवृत्तींना बळी न पडता नगररचना कार्यालयाशी निगडीत कामासाठी येथील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा इतर कोणाच्याही भुलथापांना बळी पडू नये. नागरीकांनी या कार्यालयाशी निगडीत कामासाठी थेट इकडील विभागातील अधिकारी अथवा कर्मचा-यांशी संपर्क साधावा असे आवाहन नगररचना सहा.संचालक विनय झगडे यांनी केले आहे.