no images were found
आष्टी ते नगर रेल्वेचा उद्घाटन सोहळा संपन्न
बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी ते अहमदनगर या रेल्वेचा आज उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे पाटील आदी मंडळी उपस्थित होती. याप्रसंगी ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोहळ्याला हजेरी लावली. गेल्या ३५ वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित होता. बिडवासीय या रेल्वे मार्गाच्या गेल्या ३५ वर्षांपासून प्रतीक्षेत होते. आज आष्टी ते अहमदनगर या रेल्वेला हिरवा कंदील मिळाल्याने मराठवाड्यातील शेतकरी, उद्योजक व विद्यार्थी यांना सोयीचे झाले आहे.
ही रेल्वे धावण्यासाठी ज्या ज्या नेत्यांनी संघर्ष केला, त्यांनाच याचं श्रेय जातं, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील रेल्वे प्रत्यक्षात उतरली आहे. त्यांनी ही रेल्वे धावण्यासाठी खूप कष्ट घेतले असतील तरीही त्यांचं नाव या रेल्वेला देण्याची मागणी मी करणार नाही, कारण त्यांना ते आवडणार नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी याप्रसंगी केले. मराठवाड्यातील शेतकरी, विद्यार्थी आणि उद्योजक वर्गाच्या दृष्टीने ही रेल्वे अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्वरित बीड ते मुंबई असा टप्पाही या रेल्वेने पूर्ण करावा, अशी आशाही व्यक्त केली जात आहे.