no images were found
न्यू पॉलिटेक्निकचा कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर्स वेलफेअर असोसिएशनशी सामंजस्य करार
कोल्हापूर (प्रतिनिधी): श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील एनबीए मानांकन प्राप्त न्यू पॉलिटेक्निक आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर्स वेलफेअर असोसिएशन यांच्यात सामंजस्य करार झाला.
असोसिएशन अंतर्गत कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातील ११०० वर टू व्हीलर व फोर व्हीलर डीलर्स कार्यरत आहेत. या करारानुसार विद्यार्थी, शिक्षक आणि डीलरशिपचे कर्मचारी यांच्यासाठी तज्ञांची व्याख्याने, तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा, अभ्यास भेट, संसाधनांची देवाणघेवाण, प्रायोजित प्रकल्प असे उपक्रम राबविले जातील.
न्यू पॉलिटेक्निकचे विद्यार्थी मुलभूत तंत्रज्ञानात सक्षम आहेत. या करारान्वये इच्छुक विद्यार्थ्यांना विद्यावेतनासह इंटर्नशिपद्वारे आवश्यक व्यवस्थापकीय कौशल्ये विकसित करून थेट व्यवस्थापकीय पदावर नियुक्ती दिली जाईल आणि त्यांना मेट्रो सिटी समकक्ष मानधन दिले जाईल, असे असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यावेळी म्हणाले.
या करारान्वये डीलरशीपमधील कर्मचाऱ्यांना आवश्यक सैध्दांतिक तांत्रिक ज्ञान देण्यासाठी न्यू पॉलिटेक्निकतर्फे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जातील, असे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी सांगितले.
याप्रसंगी असोसिएशनचे संचालक युनिक ऑटोमोबाईल ग्रुपचे एमडी विशाल चोरडिया, कोंडुस्कर बिजनेस ग्रुपचे एमडी इंद्रजीत कोंडुसकर, रिव्हर साईड होंडाचे सीईओ सुशांत ढणाल आणि ब्रिलियंट अकॅडमीचे आशिष कुलकर्णी उपस्थित होते. या करारासाठी ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा. सुहासचंद्र देशमुख आणि न्यू पॉलिटेक्निकचे माजी विद्यार्थी व रिव्हर साईड होंडाचे सीईओ सुशांत ढणाल यांनी विशेष प्रयत्न केले. ‘प्रिन्स शिवाजी’ चे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.