no images were found
वागले की दुनिया’ मालिकेत मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले
सोनी सब वाहिनीवरील ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ एक हलकी फुलकी मालिका आहे, जी सामान्य माणसापुढे असलेल्या दैनंदिन समस्यांचे चित्रण करते. प्रत्येक नवीन भागात वागले परिवार एका नवीन विषयाला हात घालतो. आगामी कथानकात साई दर्शन सोसायटीमधील पहिल्यांदाच मतदान करत असलेल्या तरुणांना एक-एक मताचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी स्वतः राजेश (सुमित राघवन) आणि वंदना (परिवा प्रणती) वागले आपल्या शिरी घेताना दिसतील.
साई दर्शन सोसायटीतील तरुण मंडळी आगामी निवडणुकीत मतदान करण्याच्या बाबतीत फारशी उत्साही नाही, हे लक्षात घेऊन त्यांना या बाबतीत प्रोत्साहित करण्यासाठी सोसायटीतील वरिष्ठ मंडळी एक नामी युक्ती शोधून काढतात. सोसायटीचे सदस्य सोसायटीच्या सचिव पदावर एक महिन्यासाठी दक्षेश जोशीपुरा (दीपक परीक) च्या जागी एका नवीन सदस्याची नेमणूक करायचे ठरवतात आणि वंदना, ज्योती (भक्ती चौहान) आणि श्री. वालिया या पदासाठी उमेदवारी करतात. वंदनाचे निवडणूक घोषणापत्र सोसायटीच्या आणि त्यातील सदस्यांच्या कल्याणाभोवती केंद्रित असते, पण ती केवळ एक मताने हरते. दुसरीकडे, ज्योती आणि वालिया या दोघांचा फोकस सोसायटी सुंदर करण्यावर असतो, त्यामुळे ते युती करतात. अशा अनोख्या पद्धतीने राजेश आणि वंदना सोसायटी सदस्यांना प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देतात.
राजेश वागलेची भूमिका करत असलेला सुमित राघवन म्हणतो, “लोकशाहीत मतदान हा केवळ एक हक्क नाही तर ती एक जबाबदारी आहे. आपला देश म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. त्यामुळे या देशात तरुण पिढीने मतदानाचे महत्त्व जाणणे अत्यावश्यक आहे. ‘वागले की दुनिया’ मालिकेतल्या या कथानकातून आम्ही हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की, प्रत्येक मतामुळे लक्षणीय फरक पडू शकतो.”
वंदना वागलेची भूमिका साकारणारी परिवा प्रणती म्हणते, “नव्या पिढीला केवळ शब्दांमधून एखादी गोष्ट पटवून देणे जरा कठीण असते. त्यामुळेच वंदना आणि राजेश त्यांच्यापुढे एक उदाहरण सादर करण्याचे ठरवतात. त्यांना हे दाखवून देतात की, आपल्या सोसायटीचे भवितव्य अक्षरशः आपल्याच हातात आहे. प्रत्येकाने आणि विशेषतः तरुण पिढीने आपल्या मताचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. या एपिसोड्सच्या माध्यमातून आपल्या समाजाला आकार देण्यात प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेचे महत्त्व आम्ही अधोरेखित केले आहे.