no images were found
‘इंडियन प्रेस क्लब’ पत्रकार बैठक उत्साहात संपन्न
कराड : इंडियन प्रेस क्लब या पत्रकार संघटनेची बैठक रविवार दिनांक 18 रोजी कराड येथे संपन्न झाली. समाजासाठी दिवसरात्र आपली पत्रकारिता पणाला लावून प्रसंगी वाईटपणा घेवूनही सत्य मांडणारे पत्रकार आपल्या न्याय, हक्क आणि अडचणीसाठी संघटनेच्या माध्यमातून आपले मत मांडत असतात. बैठकीमध्ये संघटनेच्या पुढील वाटचालीस बद्दल चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने राज्य कार्यकारणी भक्कम करणे तसेच संघटना आर्थिकदृष्ट्या प्रबळ करणे, संघटनेमार्फत शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन देणे तसेच राज्यभर संघटना कशी वाढेल यावर विचार करण्यात आला. संघटनेचे पहिले अधिवेशन लवकरच घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या अधिवेशनामध्ये राज्यातील सर्व संघटनांचा सहभाग कशा पद्धतीने करून घेता येईल यावर सर्वच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. राज्यात अनेक पत्रकार संघटना आहेत. स्थानिक पातळीपासून राज्य पातळीवर या संघटनांचा विस्तार झाला आहे. परंतु पत्रकारांच्या प्रश्नांचा विचार शासन गांभीर्याने घेत नाही याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला. शासनाने किमान दहा वर्षे पत्रकारिता केलेल्यांना पेन्शन योजना लागू करावी व ऍक्रिलेशन कार्ड मिळावे तसेच तालुका पातळीवर शासनाने सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत एक पत्रकार भवन उभे करावे व ते फक्त पत्रकारांनाच देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येणार आहे; असा ठराव बैठकीत करण्यात आला. यावेळी कराड येथील बैठकीनंतर सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी कैलास थोरवडे यांची निवड करण्यात आली. बैठकीला केंद्रीय अध्यक्ष श्री. विवेक पाटील, कोल्हापूर, कार्याध्यक्ष श्री. हाजी अब्दुलभाई शेख मिरज, उपाध्यक्ष श्री.राजेंद्रकुमार शिंदे चिपळूण, सरचिटणीस श्री. विकास कुलकर्णी, मिरज, खजिनदार श्री. जावेद मुजावर रत्नागिरी , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. शहाजहान आत्तार सोलापूर, सदस्य श्री.जयंत चिव्हाने मुंबई, श्री. प्रदीप कोले सांगली, श्री. सदाशिव खटावकर कराड, सौ. प्राजक्ता किणे रत्नागिरी, श्री. तन्मय पाटील जिल्हाध्यक्ष सातारा, पत्रकार अक्षय मस्के व कराड मधील बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.