
no images were found
मतदानादिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी
कोल्हापूर, : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. दिनांक 7 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कारखाने, दुकानातील सर्व कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या शासन परिपत्रकाची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी दिले आहेत. याबाबत दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. बैठकीस विविध औद्योगिक वसाहत मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, क्रिडाई, सराफ असोसिएशन, गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशन व इतर व्यावसायिक, मालक असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघ व सीमेलगतच्या राज्यामधील मतदारसंघातील जे मतदार जिल्ह्यातील विविध कारखाने, दुकाने, आस्थापना, शॉपिंग मॉल, हॉटेल येथे काम करतात, त्या कामगारांना दिनांक 7 मे 2024 रोजी मतदानासाठी भरपगारी सुट्टी देऊन शासनाच्या निर्देशाचे पालन सर्व मालक वर्गाने करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी बैठकीत दिल्या.
ज्या आस्थापनांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये पूर्ण वेळ सुट्टी देणे शक्य होणार नाही, त्या आस्थापनांनी अपवादात्मक परिस्थिती व उचित कारणासह दिनांक 3 मे 2024 रोजी पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सवलतीसाठीचे अर्ज करावेत. या अर्जाची तपासणी करुन निर्णय घेण्यात येवून आस्थापनांना सवलत देण्यात येईल. या बैठकीत आस्थापना प्रतिनिधींच्या सर्व शंकाचे निरसन करण्यात आले.
बैठकीस अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.