no images were found
शहरात महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचाराची “रणधुमाळी”
कोल्हापूर(प्रतिनिधी) : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर शहरातील प्रचाराचा शुभारंभ रविवार दि.२१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर कोटीतीर्थ येथून होणार आहे. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर अत्याधुनिक एल.ए.डी व्हॅन, रिक्षा आदी प्रचार वाहनांचे पूजन करून प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
श्री.राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, महायुती शिवसेनेचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार समस्त शिवसैनिक आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. शहरात दि.२१ पासून अत्याधुनिक एल.ए.डी व्हॅन, २२ ठिकाणी सभा, सुमारे २५ प्रचार फेऱ्या, ७५ हून अधिक ठिकाणी मिसळ पे चर्चा, व्यक्तिगत भेटी गाठी, मॉर्निंग वॉक भेटीगाठी, पॅम्प्लेट वाटप, पथनाट्य व वासुदेव यांच्यामार्फत प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. अत्याधुनिक एल.ए.डी व्हॅनद्वारे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचे लोकहिताचे काम, महायुतीने कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिलेला निधी, शिवसेनेचे सामाजिक काम यांच्या चित्रफिती प्रसारित केल्या जाणार आहेत. यासह प्रचार फेरी द्वारे भागाभागात वातावरण निर्मिती केली जाणार आहे. व्यक्तिगत भेटीगाठी घेवून शिवसेनेचे काम नागरिकांपर्यंत पोहचविले जाणार आहे. याकरिता शिवसैनिक व महायुती कार्यकर्ते सज्ज असल्याचेही श्री.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर कोटीतीर्थ मंदिर – मातंग वसाहत- राजारामपुरी बस रूट – मारुती मंदिर – मेन रोड – जनता बझार अशी प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. यासह कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा अमृतसिद्धी हॉल कळंबा येथे सायंकाळी ६.०० वाजता पार पडणार असल्याचीही माहिती श्री.क्षीरसागर यांनी दिली.