
no images were found
सक्षम’ मोबाईल ॲप दिव्यांग मतदारांसाठी वरदान
कोल्हापूर : निवडणुकीत सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांतर्गत, दिव्यांगांसाठी मतदानाचा हक्क वापरणे सोपे आणि सोयीचे व्हावे या उद्देशाने सक्षम ॲप तयार करण्यात आले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की, दिव्यांग मतदारांच्या सोयीच्या दृष्टीने हे मोबाईल ॲप दिव्यांग मतदारांसाठी वरदान ठरत आहे. दिव्यांग व्यक्ती या ॲपचा वापर करून निवडणुकांशी संबंधित विविध मतदार-केंद्रित सेवांचा लाभ घेऊ शकतात. जिल्हा निवडणूक अधिकारी पुढे म्हणाले की, सक्षम ॲपचा इंटरफेस दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अनुकूल करण्यात आला आहे. सक्षम ॲपद्वारे, दिव्यांग मतदार मतदार यादीतील त्याचे नाव तपासू शकतो, मतदान केंद्राचे स्थान शोधू शकतो आणि बूथपर्यंत पोहोचण्यासाठी व्हीलचेअरची विनंती करू शकतो.
याचबरोबर एखादी व्यक्ती नवीन मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करू शकते, मतदार कार्डमध्ये दुरुस्तीची विनंती, मतदार कार्ड आधारशी लिंक करणे किंवा निवडणूक प्रक्रियेशी संबंधित इतर प्रकारच्या सेवा याचबरोबर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची माहितीही मिळू शकते. त्यांनी सांगितले की, सक्षम ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदार मतदानाबाबत कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी संपर्क साधू शकतात आणि तक्रारही नोंदवू शकतात. याशिवाय निवडणुकांशी संबंधित ज्ञान वाढवण्यासाठी अनेक लेखही या सक्षम ॲपवर उपलब्ध आहेत.
हे ॲप गूगल स्टोअरवरून आणि आयओएस वरून डाउनलोड करता येते. आणि ॲप ओपन होताच मतदार नोंदणी, मतदान केंद्रावरील सुविधा, मतदार कार्डशी संबंधित माहिती आणि माहिती व तक्रारीचे पर्याय उपलब्ध असतील. त्यानंतर हे ॲप इतर सुविधांसाठी वापरता येईल. लोकसभा निवडणुकीत सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी, अपंगांसाठी मतदानाचा हक्क वापरणे सोपे आणि सोयीस्कर करण्यासाठी सक्षम ॲप विकसित केले आहे. दिव्यांग मतदार त्यांच्या सोयीचा विचार करून या मोबाईल ॲपचा वापर करू शकतात.
सक्षम ॲप मधील वैशिष्ट्ये
* व्हॉईस सहाय्य : अॅप दृष्टिहीन असलेल्या दिव्यांगांसाठी आवाज सहाय्य प्रदान करते.
* टेक्स्ट-टू-स्पीच : श्रवणक्षमता असलेल्या दिव्यांगांसाठी अॅप टेक्स्ट-टू-स्पीच सहाय्य प्रदान करते.
* प्रवेश योग्यता वैशिष्ट्ये : मोठे फॉन्ट आणि उच्च- कॉन्ट्रास्ट रंग
* मतदान केंद्रांविषयी माहिती: अॅपमध्ये मतदान केंद्रांबद्दल माहिती, केंद्राचे स्थान, मतदान केंद्रावर उपलब्ध प्रवेश योग्यता, मतदान अधिकाऱ्यांच्या संपर्क तपशील देते.
* तक्रारी : अॅप दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबद्दल तक्रारी नोंदवण्याची सोय करून देते.