
no images were found
मुंबई ‘आयआयटी’च्या मुलींच्या वसतिगृहातील बाथरुममध्ये छुपे चित्रीकरण?
मुंबई : आयआयटी मुंबईच्या वसतिगृह क्रमांक दहामध्ये लपून मुलींचे छुपे चित्रीकरण करणाऱ्या पिंटू गरिया (२६) या कँटीन कर्मचाऱ्याला पवई पोलिसांनी अटक केली आहे. प्रशासनाने हे कँटीन तात्पुरते बंद ठेवले असून, तेथे महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, पिंटुकडे अद्याप कोणतेही चित्रीकरण सापडले नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आयआयटी मुंबईच्या वसतिगृहामध्ये रविवारी एका विद्यार्थिनीला त्यांच्या स्वच्छतागृहालगतच्या खिडकीतून कोणीतरी चित्रीकरण करीत असल्याचे निदर्शनास आले. तिने आरडाओरडा करताच सुरक्षारक्षक त्या ठिकाणी आले आणि पिंटूला ताब्यात घेतले, असे ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले. या तरुणीच्या तक्रारीवर पवई पोलिसांनी पिंटूवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पिंटू आयआयटीमधील कँटीनमध्ये काम करतो. कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण अथवा छेडछाड झाली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ‘पेस्ट कंट्रोल’ केल्यामुळे रविवारी कँटीन बंद होते. मात्र, तेथे काम करणारे कर्मचारी त्या वास्तूत होते. हा प्रकार घडताच संस्थेतील शीघ्र कृती दल, सहायक अधिष्ठाता, अधिष्ठाता यांनी वसतिगृहात जाऊन पाहणी केली. यानंतर तातडीने येथील कँटीन बंद करण्याचा निर्णय घेतला. पिंटू पाइपच्या डक्टवर चढून त्या खिडकीपर्यंत पोहोचल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.
मुलींच्या वसतिगृहात कँटीन कर्मचाऱ्याने रविवारी ‘पाइप डक्ट’वरून जाऊन गैरप्रकार केल्याचे समोर आल्याचे आयआयटी प्रशासनाने मंगळवारी स्पष्ट केले. विद्यार्थिनींच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि दोषीला पकडणे शक्य झाले. पोलिस पुढील चौकशी करत असून, यामध्ये सायबर चौकशीही होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.