no images were found
निवडणूक कामकाजाच्या प्रत्येक टप्प्यावर सुक्ष्म नियोजन करा – अमोल येडगे
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व सहभागी यंत्रणा कार्यान्वित करून प्रत्येक टप्प्यावर सुक्ष्म नियोजन करा अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. नामनिर्देशन शुक्रवार, दि.12 एप्रिल पासून दाखल होत असून या अनुषंगाने सर्वच यंत्रणा त्या त्या ठिकाणी सुरू होणे आवश्यक आहे. सहभागी सर्व निवडणूक अधिकारी कर्मचारी हे कामकाजाबाबत सुसज्ज असल्याची खात्री करून त्यांना सचेत करा असे सांगितले. कोल्हापूर जिल्हयातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघासाठी मनुष्यबळ पुरविण्यात आले असून आवश्यक भौतिक सुविधा पुरविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मतदान केंद्र निहाय आवश्यक किमान सोयीसुविधा तसेच ईव्हीएमबाबत सुरक्षा, निवडणूक साहित्य आदी बाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सादरीकरण केले. मतदानाच्या प्रत्येक टप्प्यावर करावयाची कामे याबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, सर्व जिल्हास्तरीय नोडल अधिकारी व सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक कर्मचाऱ्यांचे दुसरे रॅण्डमायझेशन 20 एप्रिलला तर दुसरे प्रशिक्षण 27-28 एप्रिलला होणार आहे. यावेळीच्या मतदानाअगोदर सर्व मतदारांना निवडणूक विभागाकडून मतदान स्लीप वाटप करण्यात येणार आहेत. दिव्यांग व 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना घरपोच मतदान सुविधा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे अतिरीक्त मनुष्यबळ नेमण्यात येणार आहे. या अनुषंगिक आवश्यक साहित्य व दळणवळणाच्या सुविधा वेळेत देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मागील निवडणुकीत जिल्हयातील 387 मतदान केंद्रावर सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या ठिकाणी स्वीप अंतर्गत कार्यक्रम घेवून तेथील मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी योजना आखा. तसेच मागील मतदान टक्केवारीमधे कोणत्याही मतदान केंद्रावर घट होता कामा नये याबाबत जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना सूचना केल्या.
मतदान केंद्र ठिकाणी व नियुक्त निवडणूक कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवा – सध्या उन्हाळा तीव्र होत असून दुपारचे तापमान वाढत आहे. याचा परिणाम मतदान केंद्र ठिकाणी आलेल्या मतदारांवर व सर्व नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांवर होवू नये म्हणून सर्व प्रशिक्षण ठिकाणी निवारा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. क्षेत्रियस्तरावर काम करणाऱ्या व वेगवेगळ्या फिरत्या पथकांसाठी आवश्यकता पडल्यास रूग्णवाहिका व स्थानिक रूग्णालयात आवश्यक सुविधा असल्याची खात्री करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिले.