no images were found
महेंद्र चषक खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित आदित्य सह रविंद्र, सोहम, ऋषिकेश आघाडीवर
कोल्हापूर (प्रतिनिधी) :- पद्माराजे गर्ल्स हायस्कूल मधील बुद्धिबळ हॉलमध्ये नवकार चेस फौंडेशनने आयोजित केलेल्या महेंद्र चषक खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्या.या स्पर्धेत पुणे, सांगली,मिरज, जयसिंगपूर,सातारा,बेळगाव,निपाणी व स्थानिक कोल्हापूर मधील नामवंत शंभर बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत यामधील 28 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत.या स्पर्धा स्विस लिग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण आठ फेऱ्यात होणार आहेत.या स्पर्धेचे उद्घाटन महेंद्र ज्वेलर्स कुशल ओसवाल व लक्ष्मीपुरी जैन मंदिरचे अध्यक्ष कांतीलालजी संघवी, यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले.यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, युवा उद्योजक रौनक शहा,निवृत्त एक्साईज इन्स्पेक्टर वामनराव म्हेतर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले,बुद्धिबळपटू वंदना पोतदार, लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर वेस्टचे श्रीराम भुरके,धनंजय भुरके,रवी काळे,सयाजी पाटील उपस्थित होते.स्पर्धा संयोजक रवी अंबेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर राजेंद्र मकोटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
आज झालेल्या चौथ्या फेरीनंतर अग्रमानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर, तृतीय मानांकित इचलकरंजीचा रवींद्र निकम, पाचवा मानांकित कोल्हापूरचा ऋषिकेश कबनूरकर व सातवा मानांकित कोल्हापूरचा सोहम खासबारदार हे चौघेजण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.चौथा मनांकित संतोष कांबळे, व्यंकटेश खाडेपाटील व प्रणव मोरे हे तिघेजण साडेतीन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.द्वितीय मानांकित मिरज चा मुद्दसर पटेल व सहावा मानांकित मिरजेचा अभिषेक पाटील यांच्यासह 22 जण तीन गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.