
no images were found
प्राणीशास्त्र १९९७-९९ बॅचकडून लोकस्मृती वसतिगृहास ५१ हजार
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहासाठी ५१,१११ रुपयांची देणगी आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द केली.
प्राणिशास्त्र व रेशीम शास्त्र अधिविभागाच्या सन १९९७-९९ बॅचमधील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकत्र येऊन विद्यापीठात लोकवर्गणीतून साकारण्यात येत असलेल्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहास बळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज या बॅचने कुलगुरू डॉ. शिर्के यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ५१,१११ रुपयांच्या निधीचा धनादेश सुपूर्द केला. ‘आम्ही आमच्या बॅचच्या वतीने हा निधी कृतज्ञतापूर्वक विद्यापीठास देत असून त्यामध्ये कोणाचेही वैयक्तिक नाव न येता बॅचच्याच नावे हा निधी वापरावा,’ अशी विनंती त्यांनी केली. या त्यांच्या भावनिक आवाहनाचे कुलगुरूंनी स्वागत केले. विद्यापीठाच्या अन्य माजी विद्यार्थ्यांसाठीही या बॅचची देणगी आदर्शवत स्वरुपाची असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.