
no images were found
शिवाजी विद्यापीठात व्यवसाय विकास कार्यशाळेचे उद्धाटन
कोल्हापूर (प्रतिनिधी) – शिवाजी विद्यापीठाच्या एसयुके रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट या सेक्शन-8 कंपनीमार्फत विद्यापीठ व परिसरातील नागरिकांच्याकरीता व्यवसाय विकास कार्यशाळा दिनांक 21 व 22 मार्च रोजी घेण्यात आली. कार्यशाळेस गोवा येथील अर्थ बिझनेस कन्सलटन्सीच्या रूतूजा साबणे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या उद्धाटन प्रसंगी प्रा. एम्.एस्. देशमुख, मानवविज्ञान अधिष्ठाता यांनी विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये नोकरी मिळणे कठीण होणार आहे, त्यामुळे त्यांनी आतापासूनच स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची तयारी करावी लागेल. तसेच सध्या आर्थिक स्तरावर आपला देश जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकावर आहे त्यास आपणास दुस-या किंवा तिस-या क्रमांकावर आणावयाचा असल्यास आपल्या युवापिढीला नोकरी मागत फिरण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय सुरू करावा लागणार आहे असे सांगितले. विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाचे संचालक प्रा. एस्.डी. डेळेकर यांनी सांगितले की, शिवाजी विद्यापीठ आता विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे उद्योग कल्पना प्रत्यक्षात आणण्यास सक्षम झाले असून त्यास महाराष्टृ शासनाच्या महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीने 5 करोड, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाने 1 करोड व उद्योगांना बीजभांडवल देण्याचे मान्य केले असून याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे, विद्यापीठाचे उद्योग व विद्यापीठ साहचर्य केंद्रही विद्यार्थ्यांना इंडस्टृीबरोबर जाण्यास मदत करत आहे.
तज्ञ मार्गदर्शिका रूतुजा साबणे, अर्थ कन्सलटनसी सर्व्हीसेस यांनी उद्योगांची ओळख, तंत्र व उद्योग चालू करण्याचे सोप्या भाषेत समजावून सांगितले. कार्यशाळेच्या दुस-या दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांच्या नवकल्पनेतून उद्योग सुरू करण्याकरीता मार्गदर्शन केले. तसेच उद्योगाला कुठून बीज भांडवल तसेच कर्ज पुरवठा मिळू शकेल याबद्दलही मार्गदर्शन केले. समारोपाचे प्रमुख पाहुणे डॉ. एम्.एम्. गुरव, विभाग प्रमुख, वाणिज्य व व्यवस्थापन विभाग यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी उद्योग कार्यशाळा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देवून अभिनंदन केले व कार्यशाळा पूर्ण करून न थांबता स्वत:चा नवउद्योग सुरू करावा असे सुचविले. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. पी.डी. राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले व आभार प्रदर्शन शिवानंद पाटणे, इनक्युबेशन मॅनेजर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिसभा सदस्य विष्णू खाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.