no images were found
महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध सोने व्यापाऱ्याच्या कार्यालयावर छापेमारी
जळगाव : ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाने जळगावच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार आणि माजी खासदार ईश्वर लाल जैन यांच्या सहा कंपन्यांवर मुंबई, नाशिकसह अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. कोषाध्यक्ष असल्याने पार्टीला मिळालेली फंडिंग आणि कागदपत्रांसह अनेक कारणांमुळे चौकशी सुरु आहे. या कारवाईमुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत खळबळ उडाली आहे.
जळगाव आणि नाशिकच्या एकूण सहा कंपन्यांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून या सगळ्या ठिकाणी तपास सुरु होता. कुठल्या कारणामुळे चौकशी झाली ते समजू शकलेलं नाही. काही राजकीय कारणांमुळे ही चौकशी झाल्याच काही विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं. नवभारत टाइम्सने हे वृत्त दिलय.
मुंबई, नागपूर, औरंगाबादमध्ये सुद्धा ईडीने कारवाई केली. गुरुवारी जळगावमध्ये एकाचवेळी दहा गाड्या दाखल झाल्या. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या जळगाव-नाशिकमधील एकूण सहा कंपन्यांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. त्या ठिकाणची संपत्ती आणि कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. मनीष जैनची सुद्धा अधिकाऱ्यांनी चौकशी केली. ईडीच्या 60 सदस्यीय पथकाकडून ही चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असातना ग्राहकांना आत जाण्याची परवानगी नव्हती. त्याचवेळी आतमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर पाठवण्यात आलं. दोन्ही टीम्स कुठल्या कारणामुळे चौकशी करत होते, ते समजलेलं नाही. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात सीबीआयने राजमल लखीचंद ज्वेलर्सची चौकशी केली होती.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी शरद पवार यांचं समर्थन केलं होतं. ईश्वरलाल जैन बराचकाळ विधान परिषदेवर आमदार होते. मनीष जैन यांनी शरद पवार यांची साथ सोडली व अजित पवारांसोबत गेले. ईश्वरलाल जैन 10-15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार होते.