no images were found
इचलकरंजी नगरीमध्ये शाहिरी महोत्सवाचे आयोजन ;सुप्रसिद्ध शाहिरांच्या डफासोबत घुमणार विररसाचे पोवाडे
इचलकरंजी : पोवाडे गाऊन समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात. तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात. सांस्कृतिक कार्य संचालनालय संस्कृतीचे जतन व संवर्धन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नगरीमध्ये शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी कोल्हापूर येथे भव्य शाहिरी महोत्सवाचे आयोजन दिनांक २० मार्च ते २२ मार्च, २०२४ दरम्यान करण्यात येणार आहे. या शाहिरी महोत्सवाची संकल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची आहे.
शाहिरी व संगीतावर आधारित असा भव्य सांस्कृतिक महोत्सव येत्या २० मार्च ते २२ मार्च, २०२४ दररोज सायंकाळी ७:०० वाजता श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या प्रथम पुष्पात दिनांक २० मार्च, २०२४ रोजी युवा शाहिरा क्रांती व कीर्ती जगताप यांच्या पोवड्याने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सुप्रसिध्द शाहीर अनंतकुमार साळुंखे, सांगली, शाहीरा श्रीमती. निशिगंधा साळुंखे, लातूर व खानदेशातील सुप्रसिध्द शाहीर तथा राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते शिवाजीराव पाटील यांचे सादरीकरण होईल.
या महोत्सवाच्या व्दितीय पुष्पात दिनांक २१ मार्च, २०२४ रोजी सुप्रसिध्द युवा शाहीर अजिंक्य लिंगायत, सुप्रसिध्द शाहिरा कल्पना माळी तसेच राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त शाहीर अवधूत विभुते यांचे देखील सादरीकरण होईल.
या महोत्सवाच्या शेवटच्या पुष्पात दिनांक २२ मार्च, २०२४ रोजी युवाशाहीर अमोल रणदिवे यांचे सादरीकरण त्यानंतर, शाहीरा भक्ती मालुरे यांचे सादरीकरण होईल तर या महोत्सवाची सांगता ज्येष्ठ शाहीर शामराव खडके यांच्या पोवाड्याने होईल. सदर महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून या कार्यक्रमाचा रसिक प्रेक्षकांनी भरभरुन आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. विभीषण चवरे यांनी केले आहे.