no images were found
‘वागले की दुनिया’मध्ये सोसायटीच्या ग्रुपमध्ये राजेशने फॉरवर्ड केलेल्या मेसेजमुळे उडाला गोंधळ!
सोनी सबवरील ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ या मालिकेत वागले कुटुंबियांच्या दैनंदिन संघर्षाचे चित्रण दाखवून मध्यमवर्गातील सामान्य माणसासमोर असलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अलीकडच्या भागांमध्ये एक वरवर साधासा वाटणारा मेसेज पाठवल्यामुळे अनपेक्षित घटनांची मालिका सुरू होऊन काय धमाल उडते, याचे चित्रण आहे.
आगामी भागांमध्ये जेव्हा राजेश (सुमित राघवन)चा मित्र हर्षद (अमित सोनी) त्याला एक चावट मेसेज त्यांच्या ग्रुपवर पाठवायला सांगतो, तेव्हा या सामान्य गोष्टीला मजेदार वळण मिळते. राजेश सुरुवातीला थोडी आनाकानी करतो, पण मग मित्रांच्या दबावामुळे तो मेसेज हर्षदला पाठवतो. पण गंमत अशी होते की, हा मेसेज साई दर्शनच्या कुटुंबांच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड होतो, आणि गोष्टीला अनपेक्षित वळण मिळते. राजेश आपल्या कुटुंबाने हा मेसेज वाचू नये यासाठी आटापिटा करतो आणि सोसायटीत देखील एकच गोंधळ माजतो.लाजिरवाणा प्रसंग ओढवू नये यासाठी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याची राजेशची धडपड बघताना प्रेक्षकांचीही उत्कंठा वाढेल!
राजेशची व्यक्तिरेखा साकारणारा सुमित राघवन म्हणतो, “राजेश अगदी लाजिरवाण्या परिस्थितीत सापडतो. राजेशची ओळख एक अत्यंत सज्जन आणि सरळमार्गी व्यक्ती अशी आहे, जो कोणतेही चुकीचे काम करत नाही. पण चुकून तो एक अयोग्य जोक सोसायटीच्या ग्रुपवर पाठवतो. आपल्या या कृत्याने तो खजील तर होतोच पण आपल्या पत्नीने, वंदनाने तो मेसेज पाहिला तर ह्या चिंतेने तो अस्वस्थ होतो. यातून तणावपूर्ण आणि विनोदी घटनांची मालिका उलगडत जाते. हा संपूर्ण भाग बघताना प्रेक्षकांचे नक्कीच खूप मनोरंजन होईल!”