no images were found
गाय दुध अनुदानात काम करणाऱ्या दुध संस्थांना शासनामार्फत मोबदला मिळावा !-अरुण डोंगळे
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :गाय दुध अनुदान मिळवणेसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडी अडचणी बाबत चर्चा करणेसाठी दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या दालनात राज्यातील प्रमुळ दुध संघांची बैठक आज दि.११ मार्च रोजी आयोजित केली होती यावेळी या अनुदान प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या प्राथमिक दूध संस्थांना यामध्ये कोणताही मोबदला मिळत नसल्याने संस्था स्तरावरती उदासिनता आहे त्यामुळे ज्या गतीने गाय दुध अनुदान संदर्भातील माहिती यायला पाहिजे तशी येत नसल्यामुळे अनुदान देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे प्राथमिक दूध संस्थांना हे काम करत असल्याबद्दल किमान ५० पैसे इतका मोबदला मिळावा अशी मागणी गोकुळच्या वतीने या बैठकीत करण्यात आली. राज्यातील गाय दुध दराचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदानाची योजना एक महिन्यासाठी जाहीर केली ही योजना ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीसाठी होती. नुकतीच शासनाने त्यामध्ये आणखीन एक महिन्याची वाढ दिलेली आहे. असे असतानाही या अनुदान योजनेचा लाभ आज पर्यंत नगन्य दूध उत्पादकांना मिळालेला आहे याचे मुख्य कारण म्हणजे अनुदान मागणीची क्लिष्ट प्रक्रिया हे आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी आज दिनांक ११ मार्च रोजी मंत्रालयात राज्यातील प्रमुख सहकारी व खाजगी दूध संघांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीमध्ये दूध उत्पादकांना लवकरात लवकर अनुदान कशा पद्धतीने देता येईल यावरती सविस्तर चर्चा झाली यावेळी या अनुदान प्रक्रियेमध्ये घालण्यात आलेल्या नियम व अटीमुळे अनुदान मिळण्यास अडचण येत आहे या सोबतच सदरचे अनुदान हे थेट दुध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. परंतु अनुदानासाठी आवश्यक असणारी माहिती हि गावातील प्राथमिक दुध संस्थांनी द्यावयाची आहे. या प्राथमिक दुध संस्थाना या कामाचा काहीही मोबदला मिळत नसल्याने संस्था स्तरावरती हे काम करण्यासाठी उदासीनता दिसून येते हि बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊन गाव पातळीवरील प्राथमिक दुध संस्थाना या कामासाठी किमान ५० पैसे इतका मोबदला देण्यात यावा अशी मागणी गोकुळ दुध संघामार्फत यावेळी करण्यात आली. यावरती सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच याबद्दलची घोषणा करण्यात येईल असे यावेळी शासनामार्फत सांगण्यात आले.
या बैठकीसाठी दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, आयुक्त प्रशांत मोहोड, गोकुळ दुध संघ, औरंगाबाद जिल्हा दुध संघ, संगमनेर तालुका दुध संघ, बारामती दुध संघ, चितळे डेअरी, कुतवळ मिल्क या संघांचे प्रतिनिधी व शासनाचे अधिकारी उपस्थित होते.