no images were found
विदेशी नागरिकांना स्पर्श करू नका; चीनचे नागरिकांना आदेश
कोरोनाने सर्वाधिक फटका बसलेल्या चीनने आता मंकीपॉक्स विषाणूची धास्ती घेतली असून, चीनमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. यानंतर चीन प्रशासनाने विदेशी नागरिकांपासून आणि परदेशातून आलेल्या नागरिकांच्या त्वचेच्या संपर्कात न येण्याचे आदेश चीनच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे प्रमुख वू झुन्योऊ यांनी दिले आहेत.
चीनच्या चोंगकिंग शहरात परदेशातून आलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्स झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. लागण झालेली व्यक्ती परदेशी आहे की चीनी हे अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, मंकीपॉक्सचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर विदेशी नागरिकांच्या संपर्कात येऊ नये हे विधान वांशिक आणि भेदभाव करणारे आहे, अशी टीका अनेकांनी सोशल मीडियावरून करत आहेत. करोना साथीच्या काळात परदेशी नागरिकांनी भीतीपोटी ज्याप्रकारे चिनी नागरिकांचा संपर्क टाळला होता, हा तसाच प्रकार असल्याची पोस्ट ‘विईबो’ या संकेतस्थळाने केली आहे.
मंकीपॉक्स 90 देशांमध्ये पोहोचला
मे महिन्यात जगभरात मंकीपॉक्सची लागण झालेली प्रकरणे समोर येऊ लागली. त्यानंतर आता हा विषाणू जगभरातील 90 देशांमध्ये पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली असून, जगभरात 60,000 हून अधिक जणांना याची लागण झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे.
भारतात 13 रूग्ण
जगातील विविध देशांमध्ये पसरणाऱ्या मंकीपॉक्सचे रूग्ण भारतातदेखील आढळून आले असून, आतापर्यंत या आजाराचे देशात आतापर्यंत 13 रूग्ण आढळून आले आहेत. एकट्या राजधानी दिल्लीत आठ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.