no images were found
सीपीआरला मधील प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आरोग्य सुविधा द्या – अमोल येडगे
कोल्हापूर : सीपीआरमध्ये फायर फायटींगचे काम तात्काळ करुन रुग्णांची सुरक्षितता व हवा खेळती राहण्यासाठी परिसर स्वच्छ आणि मोकळा करा. अनावश्यक अतिक्रमणे हटविण्यासाठी कार्यवाही करा. सीपीआर मध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा द्या. तसेच इमारतींचे नूतनीकरण करुन सीपीआरला कार्पोरेट लुक द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सीपीआरला भेट देऊन प्रत्येक विभागाची पाहणी केली. तसेच रुग्णांशी संवाद साधला. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी रुग्णालय प्रशासनाला सूचना केल्या. यावेळी अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, उप अधिष्ठाता तथा मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. पवन खोत, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर सरवदे, कान नाक घसा विभाग प्रमुख डॉ. अजित लोकरे, स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.शिरीष शानबाग यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख व वैद्यकीय तज्ञ उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला डॉक्टरांनी चांगली सेवा द्यावी. रुग्णालयात दाखल रुग्णांना सकस आहार वेळेत मिळेल याची दक्षता घ्या. स्वयंपाकघराचे नूतनीकरण, फायर ऑडिट करुन घ्या. स्वच्छतागृहांची साफसफाई नियमित व्हायला हवी. परिसरातील अनावश्यक साहित्य काढून परिसर मोकळा व स्वच्छ ठेवा. शासन व सिद्धिविनायक सारख्या ट्रस्टच्या मदतीने पीपीपी तत्वावर एमआरआय सुविधा सुरु होण्यासाठी तर मॉड्युलर ऑपरेशन थिएटर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करा. खाजगी दवाखान्यांप्रमाणे कार्पोरेट लुक होईल, असा बदल होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यासाठी व इमारतींच्या नूतनीकरणासाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करा. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन देवून सन 2024 -25 मध्ये करावयाच्या कामांचेही योग्य नियोजन करुन प्रस्ताव सादर करा, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक विभागातील पदे, भरलेली पदे व रिक्त पदे, पदभरती प्रक्रिया, ओपीडी विभागाची वेळ, वैद्यकिय तज्ज्ञ, जिल्ह्यातील थॅलेसेमिया व हिमोफेलिया रुग्ण संख्या, सीपीआरमध्ये महिला, पुरुष, बालकांसाठी देण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सेवा सुविधा, पिण्याचे पाणी, राहण्याची, जेवणाची व्यवस्था, स्वच्छतागृहे, उपलब्ध औषधसाठा तसेच आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधांची सविस्तर माहिती घेवून जिल्ह्यातील थॅलेसेमिया व हिमोफेलिया रुग्णांना आवश्यक फॅक्टर्स आणि औषधांचा पुरवठा वेळेत करा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केल्या.
यावेळी त्यांनी बाह्य रुग्ण विभाग, अपघात विभाग, कान, नाक, घसा विभाग, नेत्र विभाग, एक्स-रे विभाग, आंतररुग्ण विभाग, बालरोग विभाग, नवजात शिशु विभाग आदी विविध विभागांना भेटी देऊन संबंधित विभाग प्रमुखांशी चर्चा केली. तसेच सीपीआर मध्ये देण्यात येणारे औषधोपचार, राहण्याची जेवणाची व्यवस्था, स्वच्छतागृह आदींबाबत जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी रुग्णांशी संवाद साधला. सीपीआर मध्ये 22 विभाग आहेत. स्त्री प्रसूती विभागात 100 बेड असून या विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून बेडची संख्या वाढवणे गरजेचे आहे. तसेच रुग्णालयाचे नूतनीकरण प्रस्तावित असून लवकरच काम सुरु होणार आहे. यासाठी पर्यायी व्यवस्था अन्य शासकीय रुग्णालयांमध्ये करणे आवश्यक असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांनी दिली.