Home शैक्षणिक मराठीच्या माध्यमातून सांस्कृतिक विविधता वृद्धिंगत करणे आवश्यक: डॉ. प्रभाकर देसाई

मराठीच्या माध्यमातून सांस्कृतिक विविधता वृद्धिंगत करणे आवश्यक: डॉ. प्रभाकर देसाई

4 second read
0
0
17

no images were found

मराठीच्या माध्यमातून सांस्कृतिक विविधता वृद्धिंगत करणे आवश्यक: डॉ. प्रभाकर देसाई

 

कोल्हापूर (प्रतिनिधी): मराठी भाषेच्या माध्यमातून सांस्कृतिक विविधता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. प्रभाकर देसाई यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘भाषा आणि संस्कृती’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे होते, तर डॉ. गोमटेश्वर पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले, भाषेच्या सहाय्यानेच सांस्कृतिक राजकारण ताब्यात घेतले जात असते. ज्याच्या हाती भाषा, त्याच्याच ताब्यात आशय, नियोजन राहते. हे मोठे भाषिक राजकारण आहे. अशा राजकारणापासून भाषेला दूर राखता येऊ शकते. भाषा ही समाजाच्या बहुसांस्कृतिक विकासाचे मोठे साधन आहे. तिच्या या क्षमतांचा सकारात्मक वापर करून घेणे आवश्यक आहे. भाषेच्या अनुषंगाने शहाणपणाची खरी जाणीव ही सर्वसामान्य लोकमानसातच असते. मराठी भाषा ही अशा जनमानसातूनच प्रवाहित आणि विकसित झालेली आहे. महानुभाव पंथापासून ते पुढे संत ज्ञानेश्वरांपासून ते अखंड संत परंपरेद्वारे हे विकसन होऊन सर्जनशीलतेपर्यंतचा भाषिक प्रवास मराठीने केलेला आहे. भाषांमध्ये उच्चनीचता असत नाही. भाषेचे अभिजातत्व हे सांस्कृतिक अधिसत्तेचे धुरिणत्व ज्यांच्याकडे आहे, ते ठरवतात. तथापि, भाषासौंदर्य, निर्मितीशीलता, बहुप्रसवता, सर्जनशीलता आदी मूल्यांकडे दुर्लक्ष करून ठराविक निकषांवर अभिजाततेची निश्चिती करण्यासाठी आग्रही राहणे गैर आहे. भाषेला प्रतिकात्मकतेमध्ये बंदिस्त करणे, तिच्याकडे शस्त्र किंवा उत्पादन म्हणून पाहणे हा खरा असंस्कृतपणा आहे. भाषा ही लोकसमूहाची निर्मिती आहे, सामूहिक सर्जनाचा इतिहास तिला लाभलेला आहे आणि तिच्यामध्ये लोकसाहित्य व श्रमसंस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले असते. या सर्वांतून ती विकसित होत राहते, हे लक्षात घ्यायला हवे. ज्यावेळी भाषा नेहमीच्या जगण्यातून बाजूला पडायला सुरवात होते, त्यावेळी आपण आपली भाषिक पाळेमुळे तपासून घ्यायला हवीत, असेही देसाई यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्षीय मनोगतात डॉ. नंदकुमार मोरे यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य विद्यार्थ्यांसमोर विषद केले. ते म्हणाले, भाषेचे सांस्कृतिक योगदान सातत्याने अधोरेखित करीत राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभ्यास करीत असताना उपयोजनाच्या अंगाने भाषिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे.

यावेळी विभागातील विद्यार्थिनी कांचन देशपांडे यांनी तलाठी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल तर राजेश पाटील व विश्वास घोडे यांची शालेय शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पदभरती परीक्षेतून गुणवत्ता यादीत निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सुस्मिता खुटाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सुखदेव एकल यांनी आभार मानले.

विद्यापीठ परिसरातून ग्रंथदिंडी

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या प्रांगणातून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात ग्रंथदिंडी काढली. हुपरीच्या संत बाळुमामा पायी दिंडी मंडळाच्या सदस्यांनी दिंडीमध्ये मोठी रंगत आणली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मान्यवर अधिकाऱ्यांच्या हस्ते पालखीपूजनाने मुख्य प्रशासकीय इमारतीपासून दिंडीला सुरवात होऊन ती परिसरातून वि.स. खांडेकर भाषा भवनपर्यंत नेण्यात आली. पालखीमध्ये भारतीय संविधान, ज्ञानेश्वरी, तुकोबारायांची गाथा यांच्यासह मराठी ग्रंथ ठेवण्यात आले होते. मुख्य इमारतीसमोर रिंगण सोहळाही रंगला. विद्यार्थी मराठी भाषेच्या प्रसार व संवर्धनाच्या अनुषंगाने तसेच विविध मराठी बोलींचे फलक घेऊन दिंडीत सहभागी झाले. यावेळी डॉ. प्रभाकर देसाई यांच्यासह वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, डॉ. वैभव ढेरे आदी सहभागी झाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…