
no images were found
पोलीस दलात तृणधान्याचा वापर वाढण्यास चालना देणार – सुनिल फुलारे
कोल्हापूर : मानवाच्या आरोग्यास तृणधान्य (मिलेट) ची आवश्यकता असुन ती योग्य प्रमाणात शरीरास मिळाली पाहिजेत. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या कॅंटीनमध्ये तसेच त्यांच्या दैनंदिन आहरामध्ये आवश्यकतेनुसार मिलेट ( तृणधान्य) चा वापर वाढविण्याबाबत चालना देणार असल्याचे मत विशेष पोलीस महानिरिक्षक सुनिल फुलारे यांनी व्यक्त केले. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन, राजारामपुरी, कोल्हापूर येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व नाबार्ड, कोल्हापूर आयोजित मिलेट (तृणधान्य) महोत्सवामध्ये आयोजित केलेल्या पाककृती स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
पाककृती स्पर्धेत एकुण 33 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सहभागी स्पर्धकांचा सुनिल फुलारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन सन्मान करण्यात आला. स्पर्धेमध्ये निहारिका शिंदे प्रथम, विमल सुर्यवंशी द्वितीय व माधुरी पाटील तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ संदीप खाते व पद्मा माने यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धेमध्ये वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी सहभाग घेवून पाककृती स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल सोनाबाई दळवी व कृष्णा मोहन, रायपूर (छत्तीसगड) येथुन महोत्सवामध्ये सहभाग घेवून तृणधान्याच्या विविध पाककृती ग्राहकांना दाखवून माहिती देत असल्याबद्दल विशेष प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. पाककृती स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. ज्ञानेश्वर पतंगे, डॉ. प्रतिभा ठोंबरे, डॉ. सुनिल कुमार व सुर्यप्रभा भोसले उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, राजारामपुरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उप सरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले व इतर मान्यवर उपस्थित होते. मिलेट महोत्सवास ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रामुख्याने गावरान ज्वारी, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील नाचणी पदार्थ आणि रायपूर येथील विशेष पाककृती महोत्सवातील आकर्षण ठरत आहे.