no images were found
वादविवाद हे ज्ञानसंवर्धनाचे खूप चांगले माध्यम – डॉ.तारा भवाळकर
कोल्हापूर (प्रतिनिधी) – वादविवाद हे ज्ञानसंवर्धनाचे खूप चांगले माध्यम आहे. वाद व्हायलाच पाहिजेत. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जो पर्यंत वादाला मोकळीक आहे तो पर्यंत ज्ञान प्रवाही अखंड चालत राहणार आहे, असे प्रतिपादन लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ.तारा भवाळकर यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीने डॉ.म.सु.पाटील समीक्षा पुरस्कार 2024 प्रदान सोहळयाचे आयोजिन विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.तारा भवाळकर प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पुढे बोलताना डॉ.भवाळकर म्हणाल्या, ज्येष्ठ समीक्षक डॉ.म.सु.पाटील यांच्या परंपरेमधून आलेले आणि त्यांची परंपरा मोडून नवीन परंपरा निर्माण करणारे समीक्षक डॉ.रमेश वरखेडे यांना त्यांच्या गुरूंच्या नावे
असलेला डॉ.म.सु.पाटील समीक्षा पुरस्कार 2024 प्राप्त झाला हे अत्यंत गौरवास्पद आहे. आमचे शिक्षक आंतरविद्याशाखीय शिक्षण देत होते.
या आंतरविद्याशाखेमध्ये सामाजिक विश्लेषण होत होते. त्यावेळस ही मंडळी आम्हाला सनातनी वाटत. त्यांचे विचार करण्याची आणि अभ्यास करण्याच्या पध्दती वेगळया होत्या. पुढे याचा उपयोग भाषिक अभ्यासामध्ये खूप झाला. यांच्या माध्यमातून आम्हाला मोकळा विचार करणारी माणसे भेटली.वितंडवादाने ज्ञान हे वर्धिष्णु होत असते आणि सांस्कृतिकपणातल्या वर्धिष्णुपणाचे हे महत्वाचे लक्षण आहे. वादाशिवाय प्रवाह चालत नाही. वाद प्रवाही राहिला नसता तर डॉ.रमेश वरखेडेंची निवड झाली नसती. यामध्ये अजूनही सत्व, तथ्य, ज्ञानाला आणि विचारांच्या समीक्षेला महत्व आहे कारण तो वाहीला पाहिजे. उपनिषदामध्ये म्हटले आहे, शिष्य ज्या वेळेस गुरूंचा पराभव करतो त्यावेळेस ज्ञान क्षेत्रात
त्याचे एक पाऊल पुढे पडलेले असते, हे या पुरस्कारामधून दिसून आले. पुरस्कार प्राप्त समीक्षक डॉ.रमेश वरखेडे म्हणाले, स्वतंत्र विचारांची क्षमता निर्माण होणे म्हणजे प्रश्न
विचारणे. माझ्या वैचारिक दृष्टीची बैठक डॉ.म.सु.पाटील यांच्या योगदानामुळे घडली. परंतु, त्यांच्या पथडीतील लिखाणाचे अनुकरण मी केलेले नाही. कवी मानाचा अभ्यास या विषयावर डॉ.पाटील खूप वाचन करीत होते. या सगळयांचा परिणाम पुढे निर्मिती प्रक्रीया आणि कवी मनाचा अभ्यास करण्यासाठी झाला. लिखाणामध्ये ज्ञानशास्त्रीय वजन असले पाहिजे, असे डॉ.म.सु.पाटील नेहमी म्हणत. पुढे तौलनिक साहित्यशास्त्र यावर अभ्यास करून मांडणी केली. अभिरूचीमुळे होणाऱ्या सामाजिक चळवळीचे काही प्रमाणात चटकेही बसले. समाजमन वाचता आले पाहिजे म्हणून सामाजिक भाषा विज्ञान शिकविण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी प्रसिध्द लेखिका-कवयित्री नीरजा आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ.अविनाश सप्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के म्हणाले, अभ्यासक, संशोधक, शिक्षक आणि प्रशासक म्हणून डॉ.रमेश वरखेडे यांनी चांगले कार्य केलेले आहे. गुरू आणि शिष्याचे नाते, व्यावहारीक नाते आणि संशोधनातील नाते याचा उत्तम पाठ या ठिकाणी दिसून येतो. डॉ.म.सु.पाटील यांनी डॉ.वरखेडे यांना शिष्य म्हणून स्विकारण्याआधी सलग दोन निबंध लिहिण्यास सांगितले आणि डॉ.वरखेडे त्यामध्ये उत्तीर्ण झाले. आजच्या विद्यार्थ्यांनीही हे प्रयत्न करून पहावेत. सुरूवातीस आपले लिखाण मार्गदर्शकास दाखवावे आणि असे प्रयत्न करून पहावे. हे करीत असताना ज्ञानाची दिवाळी करण्याची कल्पना राबविली तर परिषदा आणि परिसंवाद यांचे प्रमाण निश्चित कमी होईल. प्रश्न पडणे म्हणजे विचार करणे ही वृत्ती सर्वच घटकांनी तपासणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी अधिविभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. डॉ.रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मानपत्राचे वाचन राजेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे यांनी केले. कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास डॉ.सुनिलकुमार लवटे, मंगला वरखेडे, डॉ.राजन गवस, वसंत गायकवाड, कवी खलील मोमीन यांचेसह विविध अधिविभागांचे अधिविभागप्रमुख, शिक्षक, संलग्न महाविद्यालयातील शिक्षक आणि संशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया प्रमाणात उपस्थित होते.