
no images were found
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम
कोल्हापूर : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन 2022-23 घेण्यात आली. यामध्ये जिल्हा स्तरावर गुणांकनानुसार पात्र ठरलेल्या 9 ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्तरीय समिती मार्फत करण्यात आली. यामध्ये जिल्हास्तरीय समिती मार्फत गुणांकणानुसार प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक ग्रामपंचायत शेळकेवाडी, तालुका करवीर, व्दितीय क्रमांक ग्रामपंचायत अर्जुनी, तालुका कागल व तृतीय क्रमांक ग्रामपंचायत गोलीवडे, तालुका पन्हाळा यांना मिळाला असल्याची माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार, ग्रामपंचायत स्तरावर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा आयोजित करुन प्राथमिक तपासणी समितीने प्रत्येक जिल्हा परिषद गट स्पर्धा आयोजित केली होती. प्रत्येक जिल्हा परिषद गट निहाय अहवाल प्राप्त झाल्यानंतर तालुक्यातील ६७ जिल्हा परिषद गटाची तपासणी पूर्ण करण्यात आली. शासन निकषानुसार यापैकी गुणांकनानुसार पहिल्या ९ ग्रामपंचायती जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र करण्यात आल्या. पात्र झालेल्या ग्रामपंचायतींचे जिल्हास्तरीय समिती मार्फत गुणांकनानुसार प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक ग्रामपंचायत शेळकेवाडी, तालुका करवीर, व्दितीय क्रमांक ग्रामपंचायत अर्जुनी, तालुका कागल व तृतीय क्रमांक ग्रामपंचायत गोलीवडे, तालुका पन्हाळा यांना मिळाला आहे. यामधील प्रथम दोन क्रमांक आलेल्या ग्रामपंचायतींची निवड विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली असल्याचेही श्रीमती परीट यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.