Home शैक्षणिक विद्यापीठात साकारणार विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका

विद्यापीठात साकारणार विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका

32 second read
0
0
25

no images were found

विद्यापीठात साकारणार विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका

 

कोल्हापूर(प्रतिनिधी) :  शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त भूगोल अधिविभाग प्रमुख व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ डॉ. (अॅड.) राम पणदूरकर व त्यांच्या पत्नी हेमकिरण यांनी पेन्शन बचतीतून साठविलेल्या ३५ लाख रुपयांच्या पुंजीतून त्यांची एकमेव दिवंगत कन्या डॉ. (अॅड.) रूपाली पणदूरकर यांच्या स्मरणार्थ विद्यापीठात साकारत असणारी विद्यार्थिनींसाठीची अभ्यासिका ही त्यांची विद्यापीठास अमूल्य भेट आहे, असे भावोद्गार कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे काढले. येत्या सहा महिन्यांत या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

डॉ. पणदूरकर यांनी दिलेल्या देणगीमधून शिवाजी विद्यापीठातील ‘कमवा व शिका’ विद्यार्थिनी वसतिगृह परिसरात विद्यार्थिनींसाठी डॉ. (अॅड.) रूपाली पणदूरकर यांच्या नावे स्वतंत्र अभ्यासिका बांधण्याच्या कामाचे भूमीपूजन आज सायंकाळी अत्यंत हृद्य वातावरणात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह पणदूरकर दांपत्य आणि त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठात विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका नव्हती. तसेच वसतिगृहामध्ये त्यांना विहीत वेळेत परत येणे आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन कमवा व शिका वसतिगृहाच्या सुरक्षित परिसरात साकारत असलेल्या अभ्यासिकेमुळे विद्यार्थिनींची मोठी सोय होणार आहे. त्यासाठी पणदूरकर कुटुंबियांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी डॉ. पणदूरकर यांनी कै. रुपाली पणदूरकर यांचा स्मृतिदिन १५ सप्टेंबर असून त्या दिवशी या अभ्यासिकेचे उद्घाटन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सुरवातीला पणदूरकर दांपत्याच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, भूगोल अधिविभागाचे डॉ. संभाजी शिंदे, वसतिगृह अधीक्षक डॉ. प्रतिमा पवार, डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. विद्या चौगुले, डॉ. कविता वड्राळे, डॉ. गिरीश कुलकर्णी, रमेश पोवार, उपकुलसचिव रणजीत यादव, विजय पोवार, विद्युत उपअभियंता अमित कांबळे, शिवकुमार ध्याडे, जी.बी. मस्ती, वैभव आरडेकर यांच्यासह अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. (अॅड.) रूपाली पणदूरकर यांच्याविषयी…

अॅड. रूपाली पणदूरकर यांनी सर्व शिक्षण शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्यांनी ‘महाराष्ट्रातील बालगुन्हेगारीचा सामाजिक व कायदेविष‌यक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध सादर करून कायदे विषयात पीएच.डी. मिळविली होती. सतारवादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण गांधर्व महाविद्यालयातून घेऊन सार्वजनिक व्यासपीठांवरुन सतारवादनाचे कार्यक्रम केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या “न्यायदीप” या संशोधन पत्रिकेत त्यांचे अभ्यासपूर्ण संशोधन लेख सन्मानपूर्वक प्रसिद्ध झाले होते. त्यांनी २००१ पासून निधनापर्यंत १४ वर्षे कोल्हापूर दिवाणी न्यायालयात वकीली केली. अॅड. रुपाली यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मातापित्याने शिवाजी विद्यापीठास ३५ लाख रुपयांची देणगी दिली. त्यातून विद्यार्थिनींसाठीची अभ्यासिका साकार होत आहे.

अभ्यासिकेच्या इमारतीविषयी…

डॉ. (अॅड.) कै. रुपाली पणदूरकर अभ्यासिका इमारतीच्या आराखड्यामध्ये तळमजला अधिक दुमजली इमारत प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात १८३२ चौरस फूट क्षेत्रफळाचा तळमजला बांधण्यात येणार आहे. अरिहंत कन्स्ट्रक्शन कंपनीला सदर कामाचा ठेका देण्यात आला असून सहा महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. येथे एकाच वेळी शंभर विद्यार्थिनींची अभ्यासाला बसण्याची सोय होणार आहे. पुढील दुमजली बांधकामानंतर एकूण ३०० विद्यार्थिनींची सोय होईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

प्रिया ठाकूरची अविस्मरणीय जयपूर डायरीज

प्रिया ठाकूरची अविस्मरणीय जयपूर डायरीज झी टीव्हीवरील ‘वसुधा’ ही मालिका आपल्या भावनिक आणि र…