no images were found
शिवाजी विद्यापीठाचा डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाकडून मराठी साहित्य समीक्षेमध्ये महत्त्वाचे योगदान देण्याऱ्या ज्येष्ठ समीक्षकास किंवा समीक्षा ग्रंथास डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार देण्यात येतो. सन २०२४ चा डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ. रमेश वरखेडे (नाशिक) यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, ग्रंथ भेट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर पुरस्कार वितरण समारंभ दि.२० फेब्रुवारी, २०२४ रोजी ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ). डी. टी. शिर्के यांनी दिली.
नामवंत समीक्षक, अनुवादक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. म. सु. पाटील यांच्या कार्याची स्मृती म्हणून डॉ. म. सु. पाटील यांच्या नावे हा पुरस्कार दोन वर्षांनी दिला जातो. पाटील यांच्या कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आलेल्या देणगीतून हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ, प्रा. वसंत पाटणकर यांना डॉ. म. सु. पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यावर्षी डॉ. रमेश वरखेडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. रमेश वरखेडे यांचे मराठी समीक्षा लेखनातील योगदान भरीव स्वरूपाचे आहे. मराठीतील नामवंत लेखक, समीक्षक आणि संपादक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या आणि सामाजिकशास्त्रे या विभागाचे संचालक म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्राला भरीव योगदान दिले आहे. समाजभाषाविज्ञान, इतिहास, संशोधनाच्या पद्धती, समीक्षा, लोकसाहित्य, बालसाहित्य, भाषांतरविद्या या अभ्यास क्षेत्राशी संबंधित विपुल स्वरूपाचे लेखन त्यांनी केले आहे. ‘समाजभाषाविज्ञान’, ‘संशोधनाचे पद्धतिशास्त्र’, ‘सायबर संस्कृती’, ‘साहित्य विमर्श’, ‘साहित्य : आस्वाद आणि समीक्षा’, ‘भाषावार प्रांतरचना आणि मराठी काही परिप्रेक्ष्य’, ‘महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरांचा इतिहास’ या महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखन त्यांनी केले आहे. ‘नव अनुष्टुभ’ या नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी केलेले काम वैशिष्ट्यपूर्ण ठरले. ‘क्रिटिकल एन्क्वायरी’ हे आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे संशोधनपर नियतकालिक त्यांनी सुरू केले. अभ्यासक्रम रचना, पाठ्यपुस्तक निर्मिती, अध्ययन अध्यापन पद्धती, अध्ययन साहित्य निर्मिती, प्रकल्प संयोजन
असे त्यांचे विविधांगी कार्य आजही सुरू आहे.
सदर पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ). डी. टी. शिर्के भूषविणार आहेत. या पुरस्कार निवड समितीचे सदस्य म्हणून नीतीन रिंढे, प्रवीण बांदेकर, रणधीर शिंदे यांनी काम पाहिले. दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० वा. राजर्षी शाहू सिनेट सभागृहात हा समारंभ संपन्न होणार आहे. या पत्रकार परिषदेस मराठी विभागप्रमुख प्रा. नंदकुमार मोरे, प्रा. रणधीर शिंदे उपस्थित होते.