no images were found
विद्यापीठातून ऑलिंपिक दर्जाचे क्रीडापटू घडावेत: मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाने क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांना यश येऊन विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यापीठाने चमकदार कामगिरी बजावली आहे. आता विद्यापीठातून ऑलिंपिक दर्जाचे क्रीडापटू घडावेत, अशी अपेक्षा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या स्पोर्ट्स पॅव्हेलियननजीक प्रस्तावित क्रीडा वसतिगृहाचे भूमीपूजन श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, क्रीडापटूंसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्याचा शिवाजी विद्यापीठाचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. विद्यापीठाने बीए (स्पोर्ट्स) हा अभ्यासक्रम चालू करून शास्त्रीय पद्धतीने खेळाडू घडविण्यासाठी उचललेले पाऊलही महत्त्वाचे आहे. क्रीडा क्षेत्राचे महत्त्व सर्वच स्तरांवर जाणले गेले आहे. रेल्वे, बँका आदी सार्वजनिक आस्थापनांनी क्रीडापटूंना नोकरीत सामावून घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनानेही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकविजेती कामगिरी बजावणाऱ्या क्रीडापटूंना वर्ग-१ व वर्ग-२ पदांवर थेट भरती करवून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचाही लाभ दर्जेदार क्रीडापटूंना निश्चितपणे होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात द्वितिय जनरल चँपियनशीप मिळवून यश संपादन करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले, तर खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते कुदळ मारुन भूमीपूजन करण्यात आले आणि कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, इनोव्हेशन, इनक्युबेशन व उद्योजकता विकास केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, भैय्यासाहेब माने, अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, उपअभियंता हेमा जोशी, तांत्रिक समिती सदस्य डॉ. गिरीश कुलकर्णी, अभियंते रमेश पवार, वास्तुविशारद प्रतिनिधी संजय शेखर, डॉ. एन. डी. पाटील, प्रा. किरण पाटील, डॉ. संजय पाटील, प्रा. अमर सासणे, डॉ. देवेंद्र बिर्नाळे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. एन.आर. कांबळे, विजय रोकडे, सुभाष पवार, डॉ. धनंजय पाटील, प्रा. मनिषा शिंदे यांच्यासह व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद आणि अधिसभा यांचे सन्माननीय सदस्य, अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असे असेल क्रीडा वसतिगृह
शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा वसतिगृह तळमजला अधिक तीन मजले असे प्रस्तावित आहे. सुरवातीला तळमजल्याचे १०८२.६० चौरस मीटर क्षेत्रफळाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी ५ कोटी ६७ लाख २७ हजार २६४ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. ठेकेदार सतीश घोरपडे यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यारंभ आदेश देण्यात आले असून त्यानुसार साईट स्वच्छतेचे काम प्रगतीपथावर आहे. एक वर्षात सदर बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.