
no images were found
मॉप अप दिनाअंतर्गत राष्ट्रीय जंतनाशक मोहिम
कोल्हापूर : राज्य शासनाच्या आदेशाने महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दिनांक 13 व 20 फेब्रुवारी 2024 रोजी मॉप अप दिन अंतर्गत राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील 1 ते 19 वर्षे वयोगटातील 1,28,553 सर्व मुला व मुलींना जंतनाशक गोळया देण्यात येणार आहेत. कृमीदोष हा मातीतून प्रसारीत होणा-या जंतामुळे होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तीक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय व कुपोषणाचे कारण तर आहेच तसेच बालकांची बौध्दीक व शारीरीक वाढ खुंटण्याचे कारण ठरतो. कृमीदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात व ती अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. तसेच शाळेतही वारंवार अनुपस्थित असतात. याचा दुष्परिणाम त्यांच्या भवितव्यावर होतो. त्यामुळे भारताची भावी पिढी सुदृढ व सशक्त होणेकरिता जंतनाशक गोळ्या देणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने दि.13 फेब्रुवारी 2024 रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 1 ते 19 वर्षे वयोगटातील 1,28,553 सर्व मुला व मुलींना जंतनाशक गोळया अंगणवाडी व शाळेत देण्यात येणार आहेत. यामध्ये अंगणवाडी, इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या पटावरील असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच शाळेत न जाणा-या सर्व मुला व मुली या गोळया देण्यात येणार आहे. ज्या पात्र लाभार्थ्याना दि.13 फेब्रुवारी 2024 रोजी जंतनाशक गोळी देता येणार नाही त्यांना दि.20 फेब्रुवारी 2024 रोजी मॉप अप दिनी जंतनाशक गोळी देण्याचे नियोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
तरी महानगरपालिका कार्यक्षेत्रांतील सर्व नागरीकांनी आपल्या 1 ते 19 वर्षापर्यंतच्या सर्व मुला, मुलींना या जंतनाशक गोळया देऊन सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.