no images were found
मसालाकिंग दातारांनी मुलगा रोहितला भेट दिली १६ कोटी रुपयांची कार…
मुंबई, : दुबईतील अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी मुलगा रोहित याला तब्बल १६ कोटी रुपये किंमतीची आधुनिक व आलिशान रोल्स रॉइस फँटम एडिशन कार भेट दिली आहे. रोहित हा धनंजय यांचा धाकटा मुलगा असून त्यांच्या कंपनीत संचालकपदावर कार्यरत आहे. कंपनीच्या व्यवसाय क्षेत्रात त्याने नुकत्याच बजावलेल्या भरीव कामगिरीचे कौतुक म्हणून वडिलांनी हे बक्षीस त्याला दिले आहे.
यासंदर्भात माहिती देताना डॉ. दातार म्हणाले, मुलाचे अवाजवी लाड करणे किंवा निव्वळ दिमाखासाठी खर्च करणे हा माझ्या भेटीमागील हेतू नसून त्या कृतीला एक पूर्वेतिहासही आहे. माझ्या वडिलांनी दुबईत एक किराणामालाचे लहानसे दुकान उघडले आणि त्यांना मदत करण्यासाठी मी येथे आलो. उमेदीच्या काळात मी खूप कष्ट केले. माझ्या वडिलांनी मला जाणीवपूर्वक व्यवसायात घडवले. त्यांची एक विशिष्ट सवय होती. मुलांनी काही कौतुकास्पद काम आणि कष्ट केले तरच ते बक्षीस देत. मी तीच परंपरा पुढे चालवली.
माझ्या पत्नीने कंपनीत वित्त संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली तेव्हा जागतिक मंदी होती. अनेक उद्योग बंद पडत असतानाही तिने समर्थपणे कंपनीची ४०० टक्क्यांनी प्रगती घडवून दाखवली. त्या कौतुकादाखल मी तिला रोल्स रॉइसची फँटम कार भेट दिली. त्यानंतर माझा थोरला मुलगा हृषिकेश संचालक म्हणून व्यवसायात सहभागी झाला तेव्हा त्याने डोअरस्टेप डिलिव्हरी, ई-कॉमर्स, ऑनलाईन पेमेंट सिस्टिम, डिजीटल मार्केटिंग असे विविध पुढाकार यशस्वी राबवून कंपनीला आधुनिकतेच्या वाटेवर नेले. त्यालाही मी मर्सिडीस जी ६३ व ऑडी या कार भेट दिल्या. आताही धाकटा मुलगा रोहित याने गेल्या वर्षभरात कंपनीच्या रीटेल विक्रीत २५ टक्के लक्षणीय वाढ घडवून आपल्या कर्तृत्वाचा परिचय दिला असल्याने मी त्याला अद्ययावत रोल्स रॉइस फँटम कार बक्षीस म्हणून दिली आहे. मुले मेहनती, कल्पक आणि कर्तृत्ववान असणे ही कुठल्याही वडिलांसाठी अभिमानाची बाब असते. म्हणूनच मी मुलांचे यथायोग्य कौतुक केले आहे.
रोहित दातार म्हणाला, माझ्या आजोबांनी सुरू केलेल्या एका दुकानाचे रुपांतर माझ्या बाबांनी ५० सुपर स्टोअर्सची साखळी असलेल्या जागतिक समूहात केले. या वाटचालीत त्यांनी केलेले अथक परिश्रम आणि आव्हानांचा सामना आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे. मुलांना पैशाची किंमत असणे, कुठल्याही श्रमाची लाज न वाटणे व पाय सदैव जमिनीवर असणे, या संस्कारांना माझ्या आई-बाबांनी कसोशीने जपले आहे. गरीबीतून पुढे आलेल्या माझ्या बाबांना त्यांच्या उमेदीच्या काळात परिस्थितीमुळे साधी सायकलही मिळू शकली नव्हती. पण आम्हाला उत्कृष्ट व आलिशान कार भेट देऊन बाबा एकप्रकारे त्यांच्या तरुण वयाचे प्रतिबिंब आमच्या आयुष्यात पाहात आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करुन अदील समूहाला सातत्याने प्रगतीच्या नवनव्या टप्प्यावर पोचवणे, हेच आमचे ध्येय राहील.