
no images were found
गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षिकेने चिमुरडीला दिले गरम लोखंडाचे चटके
मुंबई : मुंबई गृहपाठ पूर्ण न केल्याने संतापलेल्या वर्ग शिक्षिकेने लोखंडी वस्तू गरम करून एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला चटके दिल्याची हृदयद्रावक घटना नवी मुंबईच्या खारघरमध्ये घडली आहे.या शिक्षिकेविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्या शिक्षिकेला अटक करण्यात आलेली नाही.
गृहपाठ पूर्ण करत नसल्याचा राग या शिक्षिकेला अनावर झाल्याने तिने चिमुकलीला चटके दिल्याचे कळतेय. याप्रकरणी महिला शिक्षिकेविरोधात बाल अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अद्याप त्या शिक्षिकेला अटक करण्यात आलेली नाही.
आरोपी शिक्षिका ही खारघरमध्ये मकरंद विहार, घरकुल सोसायची सेक्टर 15 मध्ये राहत असून, त्याच ठिकाणी ती ट्यूशन क्लास घ्यायची. आजिनाथ बावरे यांची साडेतीन वर्षांची मुलगी त्या शिक्षिकेकडे शिकायला जायची. दररोजप्रमाणे चिमुकलीच्या आई-वडिलांनी आठ तारखेला दुपारी चार वाजता ट्यूशनसाठी शिक्षिकेकडे सोडले. त्यानंतर रात्री आठ वाजता त्यांनी पुन्हा आपल्या मुलीला क्लासमधून घेऊन आले.
ट्यूशनमधून आल्यानंतर त्यांनी पाहिले असता मुलीच्या पोटरी, गालांवर आणि हातांवर चटके देण्यात आले होते. मुलीला याबाबत विचारले असता ती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यानंतर रात्री उशिरा याप्रकरणी खुलासा झाल्यानंतर हे स्पष्ट झाले की, मुलीला गरम चटके देण्यात आलेत. चिमुकलीच्या आई वडिलांनी प्रथोपचार केल्यानंतर शिक्षिकेविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुलगी गृहपाठ व्यवस्थित करत नसल्याने शिक्षिकेला राग अनावर झाला. दररोजप्रमाणे आई-वडिलांनी मुलीला शिकवणीसाठी पाठवले मात्र, गृहपाठ पूर्ण न केल्याने शिक्षिकेने मुलीला लोखंडी वस्तूच्या सहाय्याने गरम चटके दिले.