no images were found
शिव-शाहुंचे पोवाडे आणि महाराष्ट्राच्या पाऊलखुणांतून ऐतिहासिक व सांस्कृतिक दर्शन
कोल्हापूर : सांस्कृतिक कार्य विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून महासंस्कृती महोत्सव २०२४ कोल्हापुरात ३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत ऐतिहासिक शाहू मिल येथे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शाहीर खडके पार्टी लोककला मंडळ सावर्डे, तालुका शाहूवाडी यांच्या मार्फत लोककलांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये गण, गवळण, शिव-शाहूंच्या विचारावर पोवाडे सादर करण्यात आले. यानंतर महाराष्ट्राच्या पाऊलखुणा हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण हे सांस्कृतिक कार्यक्रम असून या कार्यक्रमांतून महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक वारसा तसेच इतिहास आणि चालत आलेल्या लोककलांची माहिती मिळत आहे. यातून कोल्हापुरातील जनतेला कोल्हापूरचे ऐतिहासिक वैभव, कोल्हापुरातील लोककला-लोकसंस्कृती, कोल्हापूरातील मर्दानी खेळाची परंपरा, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व खाद्य संस्कृतीचे आयोजन करण्यात आले आहे.
याबरोबरच याठिकाणी सुरु असलेले प्रदर्शनीय कलादालन, खाद्यसंस्कृती पाहण्यासाठी व तिचा आस्वाद घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी सहकुटुंब भेट दिली. यात कोल्हापुरी व्हेज आणि नॉन व्हेज पदार्थ यांचे स्टॉल तसेच इतर खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत.