no images were found
भारतात प्रथमच लाईव्ह म्युझिकवर सादर झाले “टॉम अँड जेरी” कार्टून
“टॉम अँड जेरी” कार्टून अबालवृद्धांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहे व प्रेक्षक याच्या प्रत्येक एपिसोडचा आपल्या वयाचे भान विसरून मनमुराद आनंद घेत असतात. कोणताही संवाद नसलेले हे कार्टून फक्त पार्श्वसंगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी ठरले आहे. त्या काळात तयार झालेल्या “टॉम अँड जेरी” मध्ये अत्यंत छोट्या छोट्या जागासुद्धा संगीताद्वारे उठावदार करण्याचे संगीतकार आणि वादकांचे कसब वाखाणण्याजोगे आहे. लाईव्ह म्युझिकवर यातील एखादी क्लिप सादर करणे हे खूप अवघड काम आहे, त्यातही कोणतेही नामवंत वादक नसताना फक्त विद्यार्थ्यांनी सादर करणे हे अजूनच आव्हानात्मक आहे. पण भारतात प्रथमच यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथे “टॉम अँड जेरी” कार्टूनचे लाईव्ह म्युझिकवर सादरीकरण करण्यात आले, निमित्त होते सुरज दोशी संचालित म्युझिकल डिव्हाईन अकॅडमीच्या 25 व्या वर्धापन दिनाचे. लाईव्ह म्युझिकवर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या ४ मिनिटांच्या क्लिपचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला.
सुरज दोशी यांनी २५ वर्षांपूर्वी गिटार, सिंथेसायझर आणि ड्रम्सचे प्रशिक्षण देणाऱ्या “म्युझिकल डिव्हाईन” अकॅडमीची स्थापना केली, त्यांनी आजपर्यंत अनेक वादक घडवले आहेत. सुरज दोशी यांचे शिष्य विविध नामवंत वाद्यवृंदांमध्ये आपले सादरीकरण आहेत तसेच अनेक सांगीतिक कार्यक्रमात साथसंगत करत आहेत. म्युझिकल डिव्हाईन अकॅडमीचा 25 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी २१ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथे रावेतकर ग्रुपच्या सहकार्याने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात सुरज दोशी यांच्या शिष्यांनी “टॉम अँड जेरी” च्या विशेष वादनासोबत विविध गाणी तसेच जुन्या काळातील लोकप्रिय जाहिराती सादर करताना आपल्या बहारदार वादनाने प्रेक्षकांना निखळ आनंद दिला. सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी खुमासदार सूत्रसंचालन तर केलेच पण सिंथेसायझरवर “है अपना दिल तो आवारा” हे गाणे वाजवून त्यांचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांच्या समोर आणला. सुप्रसिद्ध गायक “व्हॉइस ऑफ किशोर” जितेंद्र भुरूक आणि गायिका रुपाली घोगरे यांनी आपल्या स्वरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध वादक अभिजित भदे, नितिन शिंदे आणि विजय मूर्ती यांनी आपल्या वादनाने विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. नामवंत गायक, वादक आणि अभिनेत्यांनी आवर्जून उपस्थित राहून “म्युझिकल डिव्हाईन” अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.