no images were found
राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत प्रशिक्षण इच्छुकांनी 5 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत
कोल्हापूर : केंद्रशासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री- Multipurpose Artificial Insemination Worker in Rural India (MAITRI) म्हणून प्रशिक्षण द्यावयाचे आहे व प्रशिक्षीत व्यक्तिची कृत्रिम रेतन व अनुषंगीक कार्य करण्यासाठी नियुक्ती करावयाची आहे. जिल्ह्याकरिता एकुण 250 उमेदवारांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याकडे दिनांक 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. एम. शिंदे यांनी केले आहे.
या प्रशिक्षणाव्दारे राज्यातील गायी-म्हशीमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढेल व ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध होईल, त्यामुळे दुग्धउत्पादनात वाढ होवून शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने असून यामध्ये 1 महिना क्लासरुम ट्रेनिंग व 2 महिने प्रॅक्टीकल ट्रेनिंगचा समावेश आहे. क्लासरुम ट्रेनिंग पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येणार आहे व प्रॅक्टीकल ट्रेनिंग जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालय या ठिकाणी घेण्यात येईल.
प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदार हा किमान 12 वी उत्तीर्ण झालेला असावा, त्याचे वय 18 ते 35 वर्ष असावे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. व्ही. बाबर यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.