no images were found
शिवसेनेबरोबर सत्तेत बसलेलं चालतं, मग भाजपाबरोबर का नाही?-अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक सभांमधून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. अजित पवार कधी नाव घेऊन तर कधी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका करतात, तर बऱ्याचदा शरद पवारांना त्यांच्या वाढलेल्या वयाची आठवण करून देत आहेत. अजित पवारांनी शरद पवारांना अनेकदा अप्रत्यक्षपणे निवृत्तीचा सल्लादेखील दिला आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवारांनी पक्ष सोडून आणि पक्षाची मूळ विचारधारा सोडून भाजपाबरोबर चूल मांडली आहे, असा आरोप शरद पवार गटाने केला आहे. यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच जुन्नरमध्ये सभा पार पडली. यावेळी अजित पवार म्हणाले, “शिवसेनेबरोबर सत्तेत बसलेलं चालतं, मग भाजपाबरोबर सत्तेत बसलेलं का चालत नाही?” अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांचं सरकार आता जातंय हे समजलं होतं त्याचवेळी पक्षातील सगळ्यांनी ठरवलं होतं की, आपण आता भाजपाबरोबर सरकारमध्ये जायचं. महाविकास आघाडीत शिवसेनेबरोबर सरकारमध्ये सामील झालेलं चालतं, मग महायुतीत भाजपाबरोबर गेलं तर का चालत नाही? राजकारणात वेगवेगळ्या घटना घडत असतात. परंतु, वरिष्ठांनी निर्णय घेतला तर तो बरोबर आणि आम्ही घेतला तर तो चूक… असं कसं चालेल?
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडी बनवून २०१९ मध्ये महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली होती. परंतु, हे सरकार केवळ अडीच वर्षे टिकलं. जून २०२२ मध्ये शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळा गट बनवला आणि भाजपाबरोबर मिळून सत्तास्थापन केली. त्यानंतर अजित पवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले. परंतु, एक वर्षानंतर अजित पवारांनीदेखील एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळा गट बनवला. या गटासह अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर अजित पवार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले आणि त्यांच्या गटातील आठ आमदार मंत्री झाले.