
no images were found
महाविकास आघाडीच्या जागावाटपावरील चर्चा अंतिम टप्प्यात
देशभरातील सगळेच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. इंडिया आघाडीतल्या पक्षांमध्येही जागावाटपावर चर्चा चालू आहेत. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या तीन पक्षांमध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांबाबत चर्चा चालू आहेत. ही चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि जागावाटप जवळपास निश्चित झालं असून केवळ अधिकृत घोषणा होणं बाकी आहे असं महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, इंडिया आघाडीत काँग्रेस पक्ष इतर पक्षांपेक्षा जास्त जागा मिळवण्यासाठी दादागिरी करतेय अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. यावर इंडिया आघाडीतले प्रमुख नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला की, इंडिया आघाडीत जास्त जागा (लोकसभा निवडणूक) मिळवण्यासाठी काँग्रेस पक्ष इतर पक्षांवर दादागिरी करत असल्याची चर्चा सुरू आहे, यात किती तथ्य आहे? यावर शरद पवार म्हणाले, काँग्रेस इंडिया आघाडीतल्या इतर पक्षांवर दादागिरी करतेय असं मला वाटत नाही. उलट आम्ही सगळे मिळून पुढे जात आहोत.
इंडिया आघाडीतल्या पक्षांच्या बैठकीवर बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, इंडिया आघाडीच्या सध्या ज्या बैठका चालू आहेत त्या सुरुवातीच्या टप्प्यातल्या बैठका आहेत. आमच्या आजच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. अनेक पक्ष एकत्र येतात तेव्हा प्रत्येकाची स्वतःची वेगळी मागणी असते. यावर मार्ग काढून पुढे जाणं महत्त्वाचं असतं. एकत्र येऊन काम केल्यास आपण पुढे जाऊ शकू. आम्ही सर्वच पक्षांनी जिथे आमची ताकद आहे त्याच राज्यांमध्ये आणि भागांमध्ये निवडणूक लढवायला हवी. काँग्रेस इंडिया आघाडी तोडण्याचा किंवा इतर पक्षांवर दादागिरी करत असल्याचा प्रयत्न करतेय असं मला वाटत नाही. या केवळ तुमच्याकडील (प्रसारमाध्यमं) अफवा आहेत.
दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेणार का? या प्रश्नावरही उत्तर दिलं. शरद पवार म्हणाले, आज इंडिया आघाडीची बैठक आहे. या बैठकीला आमच्या पक्षाचे प्रतिनिधी गेले आहेत. आमचे प्रतिनिधी या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्याचा प्रस्ताव मांडतील. तसेच दोन दिवसांनी माझ्या दिल्लीतल्या निवासस्थानी इंडिया आघाडीची एक बैठक होणार आहे. त्यावेळी मी पुन्हा एकदा हा मुद्दा मांडणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) हे दोन्ही पक्ष प्रकाश आंबेडकरांना आघाडीत सामावून घेण्यास अनुकूल आहेत.