no images were found
तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मेळावा शाहूवाडी येथे संपन्न
कोल्हापूर : केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला व्यापकपणे व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून एक दिवसीय तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मेळाव्याचे सर्व तालुक्यांमध्ये आयोजन करण्यात येत आहे.जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून प्रत्येक तालुक्यात हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे अशी माहिती दिली.
बँका यांचेकडून लोकांना कर्ज पुरवठा तसेच अनुदानाच्या योजनांची माहिती मेळाव्यामध्ये मिळेल अशी माहिती दिली व नवीन उद्योजक तयार होतील तसेच जुने उद्योगांना ही अनुदानाच्या योजना व बँकांमार्फत कर्जपुरवठा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या वेळी अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण, तालुका गट विकास अधिकारी सोनाली माडकर, तालुका कृषी अधिकारी अमोल सपकाळ, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच उद्योजक व नवउद्योजक कार्यक्रमाला उपस्थित होते. तहसिलदार श्री.रामलिंग चव्हाण म्हणाले की पतपुरवठा करण्यासाठी आवश्यक सर्व योजनांची माहिती व लाभ एकाच छताखाली देण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व लोकांना या मेळाव्याचा खूप फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच याठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रदर्शनातील स्टॉल पाहण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले तालुका गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी सांगितले की शासकीय विभाग आणि बँका यांच्या योग्य समन्वयातून बचत गटांना खूप मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा होत असून यामुळे बचत गटातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळत आहे असा आनंद व्यक्त केला
या कर्ज मेळाव्यास कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्र, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ, मत्स्य व्यवसाय कार्यालय(तांत्रिक), दुग्धविकास विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), महिला आर्थिक विकास महामंडळ, तालुकास्तरीय बँक प्रतिनिधी, सर्व बँका, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.), जिल्हा रेशीम उद्योग विभाग, समाज कल्याण विभाग, आरसेटी प्रशिक्षण संस्था आदी विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. कर्ज मेळाव्यास संबंधित विभागाचे अधिकारी- कर्मचारी त्यांच्या योजनांचे माहिती पत्रक, कर्ज मागणी अर्ज व इतर आवश्यक माहितीसह उपस्थित होते.