Home शैक्षणिक माणूस-निसर्ग यांच्या सहसंबंधांचे ‘रिंगाण’मध्ये चित्रण

माणूस-निसर्ग यांच्या सहसंबंधांचे ‘रिंगाण’मध्ये चित्रण

8 second read
0
0
23

no images were found

माणूस-निसर्ग यांच्या सहसंबंधांचे ‘रिंगाण’मध्ये चित्रण

 

 

कोल्हापूर(प्रतिनिधी)  : माणूस आणि निसर्ग यांच्यातील सहसंबंधांचे मराठी साहित्यात अभावानेच आढळणारे चित्रण कृष्णात खोत यांनी ‘रिंगाण’ या कादंबरीमध्ये केले आहे. हे सहसंबंध जोपासण्याचा संदेश आपण आत्मसात केला नाही तर विनाश अटळ आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादामध्ये उमटला. शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागाच्या वतीने कृष्णात खोत यांच्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘रिंगाण’ या कादंबरीवर विशेष परिसंवाद आज आयोजित करण्यात आला. त्यामध्ये ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर, ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे आणि लेखक-अनुवादक डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी सहभाग घेतला.

अतुल देऊळगावकर ऑनलाईन स्वरुपात परिसंवादात सहभागी झाले. ते म्हणाले, निसर्गाची हत्या ही आत्महत्या आहे. आपण निसर्गाला जितके नष्ट करीत जाऊ, तितकी आत्मनाशाकडे वाटचाल करू. निसर्गातील बदलांचा प्राण्यांच्या वर्तनावर परिणाम होतो आहे. हे वेळीच समजून घ्यायला हवे. या वर्षी ३६५ दिवसांपैकी ३१० दिवस जगाच्या पाठीवर कोठे ना कोठे नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत होते. आपण निसर्गाच्या हाका वेळीच ऐकल्या नाहीत, तर वर्षभराच्या आपत्तींचे वेळापत्रक तयार करावे लागेल. कृष्णात खोत त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीमधून निसर्गाच्या बदलांचे प्रत्ययकारी सूचन करतात.  विस्थापितांच्या वेदनेचं दर्शन ते घडवितातच, पण त्याचबरोबर आजचा भोवताल आणि येऊ घातलेले जग यांचा अदमासही देतात. ‘रिंगाण’चा आवाका इतका मोठा आहे की जागतिक स्तरावर ती जाणे गरजेचे आहे.

कृष्णात खोत यांनी निसर्गापासून तुटत चाललेल्या माणसाची गोष्ट ‘रिंगाण’मध्ये सांगितली आहे, असे डॉ. रणधीर शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, खोत यांनी आपल्या गावठाण, रौंदाळ, धूळमाती, झडझिंबड आणि रिंगाण या कादंबऱ्यांद्वारे मानवी सृष्टीकडून माणूस व पर्यावरण यांच्या सहसंबंधांकडे प्रवास केला आहे. धरणग्रस्त, विस्थापितांचा संघर्ष मांडत असताना त्यांच्यामध्ये दाटून येणारी परात्मतेची आणि तुटलेपणाची भावना कळकळीने मांडली आहे. आधुनिकीकरणाची काळवंडलेली बाजू दाखवित असताना विकासाच्या संकल्पनेचं विपर्यस्त प्रारूप अधोरेखित करतात. मराठीमध्ये भू-जैविक परिसरदर्शन घडविणारे फार कमी लेखक आहेत, त्यामध्ये खोत आहेत. त्यांच्या कादंबरीतील भाषावैभव विस्मयजनक आहे. त्यामध्ये विलोभनीय गद्यनाद आणि लय आहे.

डॉ. रघुनाथ कडाकणे म्हणाले, ‘रिंगाण’ ही विस्थापित आणि विकेंद्रित जीवनचक्राची कहाणी आहे. हे एक असे बहुस्तरित वर्तुळ आहे, ज्याच्या केंद्रस्थानी समस्त प्राणीसृष्टी आहे. माणसाला निसर्गातील त्याची मूळ जागा दाखविण्याचे काम ही कादंबरी करते. आदिमता आणि आधुनिकता यांमधील झुंज आणि अंतर्विरोध यात दाखविला आहे. यामध्ये प्राणीसृष्टीचा विद्रोह ठळकपणे सामोरा येत असताना भावी काळातील वनस्पतीसृष्टीच्या विद्रोहाचे सूचनही यात दिसते. मानवी उत्क्रांतीची दिशा कोणती असेल किंवा असायला हवी, या दृष्टीने जीवन विचारास प्रवृत्त करण्याचे काम खोत यांनी या कादंबरीद्वारे केले आहे. या परिसंवादानंतर डॉ. शिंदे, डॉ. कडाकणे यांच्याबरोबरच ‘रिंगाण’च्या अनुवादक डॉ. माया पंडित यांचाही उपस्थित साहित्य रसिकांसमवेत संवाद रंगला. इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी आणि डॉ. चंद्रकांत लंगरे यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…