no images were found
शिवाजी विद्यापीठात फाउंड्री तंत्रज्ञानातील पदविका अभ्यासक्रम
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठात रसायनशास्त्र अधिविभाग व इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन (कोल्हापूर चॅप्टर) यांच्या वतीने पदव्युत्तर स्तरावरील ‘फाउंड्री तंत्रज्ञान’ हा पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात येत असल्याची माहिती रसायनशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. कैलास सोनावणे यांनी दिली.
कोल्हापूर हे फाउंड्री उदयोगासाठी देशभर प्रसिदध असून जवळपास ५००हून अधिक फाउंड्री उदयोग कोल्हापूर व जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. ऑटोमोबाईल्स व इतर गाड्यांना लागणारे विविध लाखो पार्ट्स, इंजिन ऑईल्सचे पार्ट्स, शेती अवजारे यांना लागणारा यांना कच्चा माल आदी सर्व या उद्योगातून तयार केला जातो. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल या उद्योगामध्ये होते. अलीकडे हा उद्योग कुशल मनुष्यबळाचा अभाव, नवनवीन तंत्रज्ञानाच्या जाणकारांची कमतरता यामुळे अडचणींना सामोरा जात आहे. म्हणूनच इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन (कोल्हापूर चॅप्टर) या संस्थेने पुढाकार घेऊन विद्यापीठाला अभ्यासक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव दिला. त्यानुसार विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमाची रचना नवीन शैक्षणिक धोरण -२०२० नुसार असून विद्यापीठ व फाउंड्री उद्योग यांच्या समन्वयातून तो विद्यार्थ्यांना शिकविला जाणार आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फाउंड्री उद्योगातील विविध कौशल्ये दिली जाणार असून त्यांना शंभर टक्के नोकरीची हमी मिळेल. तसेच, या अभ्यासक्रमामध्ये फाउंड्री उद्योग व्यवसायाशी संबंधित नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, स्टार्टअप्स इत्यादींचा समावेश केला असल्यामुळे काही विद्यार्थी स्वबळावर फाउंड्री उद्योग सुरु करू शकतात.
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी: कुलगुरू डॉ. शिर्के
फाउंड्री क्षेत्रामध्ये करीअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही एक सुवर्णसंधी आहे. या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तरी या अभ्यासक्रमाचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले आहे.