
no images were found
परदेशातील उच्च शिक्षणातील संधींबाबत डॉ. दिपक डुबल यांचे व्याख्यान
कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागातर्फे गुरूवारी (दि. ४ जानेवारी) सकाळी ११ वाजता राजर्षी शाहू सभागृहात डॉ. दिपक डुबल यांचे ‘परदेशातील उच्च शिक्षणातील संधी’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे. सदर व्याख्यानास अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के असतील तर, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची विशेष उपस्थिती असेल. ही माहिती अधिविभागप्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी दिली. शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. झालेले डॉ. डुबल सध्या ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेकनॉलॉजीमध्ये प्राध्यापक आहेत. गावातील एक सर्वसामान्य मुलगा ते ऑस्ट्रेलियन विद्यापीठात प्राध्यापक हा डॉ. डुबल यांचा प्रवास होतकरू आणि परिस्थितीशी झुंजणाऱ्या अनेक मुलांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी स्वतःचा एनर्जी कन्व्हर्शन अँड स्टोरेज रिसर्च ग्रुप स्थापन केला असून सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली १२ संशोधक काम करत आहेत. डॉ. डुबल यांना विविध मानसन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये ब्रेन ऑफ कोरिया (BK -२१) फेलोशिप, गव्हर्मेंट ऑफ साऊथ कोरिया (2011); हंबोल्ड फौंडेशन, अलेक्सान्डर वोन हंबोल्ड फेलोशिप, जर्मनी (2012); युरोपियन कमिशन मेरी क्युरी फेलोशिप, स्पेन (2014); इन्स्टिटयूट सिनियर रिसर्च फेलोशिप, स्पेन (2016); युनिव्हर्सिटी ऑफ एडेलैड व्हाईस चॅन्सलर फेलोशिप, ऑस्ट्रेलिया (2017); ऑस्ट्रेलियन रिसर्च कौन्सिल फ्युचर फेलो, ऑस्ट्रेलिया (2018); यंग सायंटिस्ट अवॉर्ड, नोबेल लौरेट कमिटी, जर्मनी (2013); ग्लोबल नॉमिनेशन इन टॉप ४ सायंटिस्ट्स फॉर USERN अवॉर्ड (2017); अमेरिकन स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी लिस्ट, टॉप २% सायंटिस्ट्स; फॉरेन यंग असोसिएट फेलो ऑफ महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सेस, महाराष्ट्र, इंडिया (2018); व्हिजिटींग प्रोफेसर, मिड स्वीडन युनिव्हर्सिटी, स्वीडन (२०२०-२०२१), ऑस्ट्रेलियातील प्रथम १०० पदार्थ संशोधक, आशिया-
ऑस्ट्रेलिया लीडर पारितोषिक यांचा समावेश आहे.
डॉ. डुबल यांच्या नावावर एक जागतिक, एक युरोपिअन आणि एक ऑस्ट्रेलियन अशी ३ पेटंट्स आहेत. विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे 3०० हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या शोधनिबंधांची 20,000 हून अधिक सायटेशन्स झाली असून त्यांचा एच इंडेक्स – 76 इतका आहे व आय टेन इंडेक्स 200 आहे. विविध प्रकल्पांवर मुख्य अन्वेषक (CI) म्हणून आतापर्यंत डॉ. डुबल यांनी सुमारे १५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा (30 कोटी रुपये) संशोधन निधी मिळवला आहे. सध्या ते ५ विज्ञानपत्रिकांच्या संपादकीय मंडळावर असून त्यामध्ये अग्रमानांकित नेचर पब्लिशिंग ग्रुप चाही समावेश आहे. सध्या ते सेल्फ पॉवर्ड मेडिकल डिव्हायसेसवर संशोधन करत आहेत.सदर व्याख्यान सर्वांसाठी खुले असून त्याचा लाभ सर्व संशोधक व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहनही डॉ. सोनकवडे यांनी केले आहे.