no images were found
शिवसेना टकसालीचे नेते सुधीर सूरी यांची पंजाबमध्ये गोळ्या घालुन हत्याअ
मृतसर : प्रखर हिंदुत्ववादी नेते, शिवसेना टकसालीचे नेते सुधीर सूरी यांची गोळया घालून हत्या करण्यात आली आहे. सूरी हे गोपाल मंदिराच्या बाहेर धरणे आंदोलन करत होते. यावेळी कुणी तरी त्यांच्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. दिवसाढवळ्या सर्वांच्या समोर सूरी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून अमृतसरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेशी त्यांचा कोणताही संबंध नाही.
गोपाल मंदिरच्या बाहेर कचऱ्यात देवाच्या मूर्त्या सापडल्याने त्याचा निषेधार्थ सुधीर सूरी यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. यावेळी कुणी तरी त्यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे सूरी जागीच कोसळले. गंभीर अवस्थेत असलेल्या सूरी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. यापूर्वी गुरुवारीही सुधीर सूरी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.
टिब्बा रोड येथील ग्रेवाल कॉलोनीतील पंजाबचे शिवसेना नेते अश्विनी चोपडा यांच्या घरासमोर दोन सायकलस्वारांनी त्यांच्यावर कथितरित्या गोळीबार केला होता. या हल्ल्याचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर आज पुन्हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.