Home शैक्षणिक संशोधकीय दृष्टीकोन रुजविण्यामध्ये ‘अन्वेषण’ उपयुक्त: डॉ. अमरेंद्र पाणी

संशोधकीय दृष्टीकोन रुजविण्यामध्ये ‘अन्वेषण’ उपयुक्त: डॉ. अमरेंद्र पाणी

5 second read
0
0
20

no images were found

संशोधकीय दृष्टीकोन रुजविण्यामध्ये अन्वेषणउपयुक्त: डॉ. अमरेंद्र पाणी

कोल्हापूर (प्रतिनिधी): देशभरातील तरुणाईमध्ये संशोधकीय दृष्टीकोन आणि सृजनशीलता यांना चालना देण्यामध्ये अन्वेषण संशोधन महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरतो आहे, हे या स्पर्धेला वर्षागणिक वाढत्या प्रतिसादामधून स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन भारतीय विद्यापीठ महासंघाचे (एआययू) सहसंचालक व संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. अमरेंद्र पाणी यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात एआययू, संगणकशास्त्र अधिविभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोनदिवसीय ‘अन्वेषण’ विद्यार्थी संशोधन महोत्सव-२०२३च्या समारोप समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर एआययूच्या सहाय्यक संचालक डॉ. उषा राय नेगी आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकेही प्रदान करण्यात आली. निकालामध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठांनी आघाडी नोंदविली.

डॉ. पाणी म्हणाले, अन्वेषण संशोधन महोत्सव हा देशभरातील संशोधक तरुणाईमध्ये एक लोकप्रिय मंच म्हणून पुढे येत आहे. २००७ पूर्वी महाराष्ट्रातील आविष्कार संशोधन स्पर्धा वगळता देशात एकही संशोधन, नवसंशोधन वा नवोन्मेषाला प्रोत्साहन देणारी स्पर्धा नव्हती. ही उणीव दूर करण्यासाठी भारतीय विद्यापीठ महासंघाने अन्वेषण संशोधन महोत्सव देशभरात आयोजित करण्यास सुरवात केली. याला देशातील तरुण संशोधकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून त्याद्वारे दर्जेदार संशोधने साकार झालेली आहेत. या स्पर्धेची व्याप्ती आता आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत वाढविण्यात येत असून त्यामध्ये अशा राष्ट्रीय संशोधन स्पर्धा ज्यात आंतरराष्ट्रीय संशोधक विद्यार्थी सहभागी होतील, अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्यात राष्ट्रीय संशोधक सहभागी होतील आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधक तरुणाईला एकल पद्धतीनेही सहभागी होता येईल, अशा तीन प्रकारे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाजी विद्यापीठाने या स्पर्धेचे यजमानपद अत्यंत यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह विद्यापीठ परिवाराला धन्यवाद दिले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, एखाद्या विषयावर संशोधन करीत असताना आपण अनेक प्रश्नांची उत्तरे सहजरित्या देतो. मात्र, सर्वसामान्यांच्या ज्या साध्यासोप्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला तितक्या सहजपणे देता येत नाहीत, त्या प्रश्नांना भिडून त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तरुण संशोधकांनी भावी आयुष्यात करावा. अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांपासून पळून न जाता, त्यांना सामोरे जा. विकास ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे. प्रत्येक संशोधकाने स्वतःच्या संशोधनापुरती विकासाची व्याख्या शोधावी आणि तो विकास साध्य करण्यासाठी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी, अन्वेषण महोत्सवात सादर केलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे समाजोपयोगी तंत्रज्ञानात व अल्पखर्चिक व्यावसायिक उपयोजनात रुपांतरण करण्यासाठी युवा संशोधकांनी प्रयत्न करावा, असे सांगितले.

यावेळी मंचावर कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड उपस्थित होते. सुरवातीला समन्वयक डॉ. कविता ओझा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अहवाल वाचन डॉ. कबीर खराडे यांनी केले. राजेंद्र अतिग्रे यांनी निकाल वाचन केले. तृप्ती भापकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. विजयकुमार कुंभार यांनी आभार मानले. कार्यक्रमास विषयतज्ज्ञ, संघ प्रमुख, देशभरातून आलेले परीक्षक, समन्वयक संघातील शिक्षक, प्रशासकीय सेवक, पश्चिमा विभागातील पाच राज्यांतून आलेले संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…