
no images were found
जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागात मराठी पत्रकार दिन उत्साहात
कोल्हापूर : आरोग्य पत्रकारितेकडे सातत्याने दुर्लक्ष होत आले आहे. कोविडच्या कालखंडानंतर आरोग्य पत्रकारितेचे महत्त्व लक्षात आले. म्हणून यापुढील काळात आरोग्य पत्रकारितेकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे, असे मत दैनिक लोकमतचे वरिष्ठ वार्ताहर समीर देशपांडे यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिजम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ संपादक दशरथ पारेकर होते. प्रारंभी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
समीर देशपांडे म्हणाले, कोविडच्या काळामध्ये सुरुवातीला नेमकी माहिती मिळत नव्हती. डॉक्टरांकडेही उपचार पद्धती उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रारंभी अनेक अडचणी आल्या. माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात नकारात्मक वार्तांकन झाले. परिणामी सर्वसामान्य लोकांमध्ये कोविडबद्दल धास्ती निर्माण झाली. वास्तविक पत्रकारितेमधून समाजाला धीर मिळायला हवा; मात्र कोविडच्या काळात पत्रकारिता लोकांना घाबरवत राहिली. डॉक्टरांचे मनोबल त्या काळात उंचावणे खूप महत्त्वाचे होते. शिवाय सकारात्मक माहिती लोकांपर्यंत जाणे आणि लोकांमध्ये असलेला गोंधळ तसेच भीती कमी करणे, याला माध्यमांकडून प्राथमिकता मिळणे आवश्यक होते. मी माझ्या पत्रकारितेमध्ये सातत्याने सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला. यासाठी मुद्रित माध्यमांबरोबरच डिजिटल माध्यमांची मदत घेतली. व्हिडिओ क्लिपच्या साह्याने वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत जाईल, असा प्रयत्न केला. आता कोविडचा प्रभाव कमी झाला असला तरी आपल्याला आरोग्य व्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम झाली तरी इथून पुढच्या काळामध्ये अशा गंभीर संकटावर आपण मात करू शकू. यासाठी नागरिकांनीही आरोग्याच्या बाबतीत स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे, असे देशपांडे यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात दशरथ पारेकर म्हणाले, कोविड काळात डॉक्टरांनी केलेले काम खूपच कौतुकास्पद आहे. कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना फारशी मदत झाली नाही. अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या. काही पत्रकारांचे व्यवस्थापनाकडून वेतन कमी केले गेले. इतर सर्व समाज घटकाप्रमाणे पत्रकारांनाही या संकटाचा मोठा फटका बसला; मात्र समाजानेही त्याची फारशी दखल घेतलेली नाही.