no images were found
लोकसभेबाबत आलेल्या सर्व्हेवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली
देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला २६ ते २८ आणि महायुतीला १९ ते २१ जागा मिळवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले, “आम्ही ३५ ते ४० जिंकण्याची तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काही प्रमुख लोक शिवसेना किंवा महाविकास आघाडीत प्रवेश करतील. लोकसभेला किमान ४० जागा जिंकू, असा आत्मविश्वास आहे.”
भाजपाच्या ‘मिशन-४५’ वरही संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे. “भाजपा देशात लोकसभेच्या १ हजार तर महाराष्ट्रात १४८ जागा जिंकतील. भाजपा जमिनीवरील नाहीतर हवेतील पक्ष आहे. भाजपानं ४५ जागा जिंकण्याची भाषा करणं हास्यास्पद आहे. भाजपानं स्वत:च्या ताकदीवर बोलावं,” असं आव्हान संजय राऊतांनी दिलं आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्या पार्श्वभूमीवर एबीपी-सी व्होटर्सनं सर्व्हे केला आहे. त्यात २ लाखांहून अधिक नागरिकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला २६ ते २८ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, महायुतीला १९ ते २१ जागा मिळतील. अन्य पक्षांना २ जागा मिळतील, असं सर्व्हेत सांगण्यात आलं आहे.