
no images were found
महाराष्ट्रात होणार राजकीय उलथापालथ ?
मुंबई :आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात 400 जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य असून महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा त्यांना जिंकायच्या आहेत. हे लक्ष्य त्यांनी वर्षभरापूर्वी निश्चित केले असून हे टार्गेट गाठण्यासाठी आता त्यांनी मित्रपक्षांना कमळ चिन्हावरच निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे ज्यांना हे जमणार नाही त्यांनी विषय हार्ड न करता सोडून देण्यासही भाजपने सुचवल्याचे समजते. याची सुरुवात त्यांनी राजापूर लोकसभा मतदारसंघातून केली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेकडून नाही तर कमळावर निवडणूक लढवावी लागेल, असे स्पष्ट सांगितले असल्याचे कळते.
दुसरीकडे, कल्याण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाचा म्हणजे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असून यावर सुद्धा भाजपने दावा केला असून यामुळे युतीत धुसफूस सुरू आहे. शेवटच्या क्षणी आम्ही तुम्हाला ही जागा देतो, पण कमळ हातात घ्या, असे भाजप शिंदेंना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
भाजप कधीही कुठलीही गोष्ट लगेच ठरवत नाही. त्यांच्या पुढच्या योजना या एखादे लक्ष्य गाठल्यानंतर लगेच सुरू होतात. 2024 च्या लोकसभेची तयारी त्यांनी कधीच सुरू केली असून वर्षभरापूर्वी त्यावर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. दक्षिणेत, पूर्वेत भाजपला यश मिळत नसल्याचे दिसताच त्यांनी उत्तर भारताप्रमाणे पश्चिम भारतात शत प्रतिशत भाजप या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू केली असून पश्चिम बंगाल, बिहार हाती येत नाही हे लक्षात येताच त्यांनी महाराष्ट्रावर लक्ष देताना 45 जागा कुठल्याही परिस्थितीत मिळाल्या पाहिजेत, असा निश्चय केला आहे.
यासाठी आधी शिंदे आणि नंतर अजित पवार यांना हाताशी घेतले आहे. आता फुटीर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना लोकसभा जागा हव्या असतील तर त्यांच्यावर कमळ चिन्हाचे बंधन असेल. शेवटी या फुटीर पक्षांना भाजपची गरज आहे, भाजपला त्यांची गरज नाही, असा अप्रत्यक्ष दिलेला हा इशारा आहे. मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सुद्धा लोकसभेच्या विधानसभेत अधिक रस असून कमळ तर कमळ असे म्हणून ते शेवटच्या क्षणी तलवारी म्यान करतील, असे सध्याचे वातावरण आहे.