no images were found
शिवाजी विद्यापीठात मराठा इतिहास संशोधनाबाबत राष्ट्रीय परिषद
कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवराज्याभिषेक दिन व स्वराज्य स्थापना दिन यांच्या ३५० व्या वर्धापन वर्षानिमित्त ‘मराठा इतिहास संशोधनाचा कक्षाविस्तार’ या विषयावर शिवाजी विद्यापीठात (दि. २०) तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास संशोधन केंद्राच्या समन्वयक डॉ. नीलांबरी जगताप आणि कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे सहाय्यक क्युरेटर उदय सुर्वे यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने परिषद आयोजित करण्यात आली आहे.
डॉ. जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २०) दुपारी ३ वाजता श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचे उद्घाटन करण्यात येईल. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे ‘शिवराज्याभिषेक’ या विषयावर बीजभाषण होईल. विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी यांची प्रमुख उपस्थिती असेल.
या तीन दिवसीय परिषदेत मराठा इतिहासाच्या सामाजिक-आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक, संदर्भसाधने व स्रोत, पुरातत्त्व, कला व स्थापत्य, लष्करी इतिहास, मराठा व युरोपियन अशा अनेक अंगांनी मराठा इतिहासाचा संशोधकीय वेध घेण्यात येणार आहे. त्यामध्ये देशभरातील मान्यवर इतिहास संशोधक उपस्थित राहून सहभागी होणार आहेत. २२ डिसेंबर रोजी ४.३० वाजता डॉ. अशोक चौसाळकर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचा समारोप होईल. शिवकालीन शस्त्रास्रांचे प्रदर्शनदि. २० ते २२ डिसेंबर या परिषद कालावधीत शिवाजी विद्यापीठ संग्रहालय संकुलामध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन तीनही दिवस सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत सर्वांना पाहण्यास खुले राहील. त्याचा शिवप्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. जगताप यांनी केले आहे.